वाल्हे : गायीच्या दुधाला हवा 50 रुपये दर | पुढारी

वाल्हे : गायीच्या दुधाला हवा 50 रुपये दर

समीर भुजबळ

वाल्हे : दूध दरकपातीने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला असून, गायीच्या दुधाला किमान सद्यःस्थितीत वाढत्या महागाईत 50 रुपये प्रतिलिटर दर मिळाला, तरच हे शेतकरी दुग्धव्यवसायात तग धरू शकतात, असे वाल्हे येथील दूध उत्पादक शेतकरी महादेव चव्हाण यांनी सांगितले. दूध उत्पादक शेतकरीवर्गाला दूध संघाकडून मिळत असलेल्या बाजारभावाप्रमाणे प्रतिलिटर दूध दर देण्यात येतो. मात्र, यामध्ये शेतकरीवर्गाला मिळत असलेले उत्पन्न तोट्यातच आहे. शेतकरी जनावरे टिकवायची आहेत, याच उद्देशून अजूनतरी दुग्धव्यवसाय करीत आहेत.

मात्र, शासनाने शेतकर्‍यांच्या खरेदीच्या दुधाला योग्य दर वाढवून द्यावा, नाहीतर दूध डेअरी यापुढे चालविणे अवघड होत असून, परिणामी दूध संघासह भविष्यात दूधटंचाईची अडचण निर्माण होऊ शकते. यामुळे शासनाने लक्ष केंद्रित करून दूध उत्पादक शेतकरीवर्गाला प्रतिलिटर किमान 15 रुपये दरवाढ करावी, असे वाल्हे येथील दूध डेअरीचालक अमोल खवले यांनी सांगितले.

मागील सहा महिन्यांत पशुखाद्याच्या एका पोत्यामागे 170 ते 200 रुपये दरवाढ करण्यात आली. तसेच, मागील सहा महिन्यांत दूध दरामध्ये 3 रुपये कपात करण्यात आली. एकीकडे जनावरांच्या हिरव्या चार्‍याचा गंभीर प्रश्न असताना दूध दरात वाढ होणे अपेक्षित असून, दूध दरात मात्र कपात होत आहे. पशुखाद्याच्या किमती मात्र वाढतच आहेत. यामुळेच दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे, असे वाल्हे येथील दूध उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पवार यांनी सांगितले.

Back to top button