यवत : प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये बदल्यांचे वारे

यवत : प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये बदल्यांचे वारे
Published on
Updated on

यवत; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहे. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात नव्याने आलेले शिंदे-फडणवीस सरकार विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताच जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारीवर्गात मोठे फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलिस दलातील बदल्या गणेशोत्सवानंतर होण्याची शक्यता आहे.

जिल्हा पोलिस दलात आणि महसूल विभागात मोठे बदल होऊ शकतात. जिल्हास्तरावरील महसूल आणि पोलिस दलातील उच्च पदस्थ अधिकारी यांनी आपल्या बदल्या होणार असल्याची मानसिकता तयार केली आहे. आपली वर्णी या पदावर लागावी म्हणून इतर अधिकारीवर्गाने 'फिल्डिंग' लावण्यास सुरुवात केली आहे. आपल्या मर्जीतील अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात असावा, यासाठी शिंदे आणि फडणवीस समर्थकांनी देखील मंत्रालयात 'फिल्डिंग' लावून ठेवली आहे.

पोलिस दल वगळता इतर विभागांतील अधिकार्‍यांच्या बदल्या अधिवेशनानंतर लगेच, तर पोलिस दलातील बदल्या गणपतीनंतर होणार आहेत. यात प्रामुख्याने तालुकापातळीवरील तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांच्या बदल्या होऊ शकतात; तर जिल्हापातळीवरील अधिकारीवर्गात देखील फेरबदल केला जाऊ शकतो. जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी कोणाला शिफारस देतात व ते सत्ताधारी गटात सामील आहेत का? यावरूनच नेमकी कोणाची वर्णी लागणार, ते स्पष्ट होणार आहे.

पवारांची जागा कोण घेणार?
महाविकास आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यातील अधिकारी निवडताना तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा शब्द अंतिम मानला जात होता आता. अजित पवार यांची जागा शिंदे- फडणवीस सरकारमध्ये कोणाला मिळणार? याकडे अधिकारीवर्गांचे लक्ष लागून राहिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news