पुणे : चाळीस हजार प्रमाणपत्रे एका दिवसात होणार प्रिंट; विद्यापीठात प्रिंटिंग मशिनचे उद्घाटन | पुढारी

पुणे : चाळीस हजार प्रमाणपत्रे एका दिवसात होणार प्रिंट; विद्यापीठात प्रिंटिंग मशिनचे उद्घाटन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सोमवारी गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र छापण्याच्या मशिनचे उद्घाटन
करण्यात आले. या मशिनमुळे एका दिवसात चाळीस हजार प्रिंट घेणे शक्य होणार आहे. परीक्षा विभागातील प्रिंटिंग युनिटमध्ये या मशिनचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, परीक्षा विभागातील विशेष कार्याधिकारी दत्तात्रय कुटे उपस्थित होते.

डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथील जवळपास 650 महाविद्यालयांशी संलग्न असून, साधारण आठ लाख विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून गुणपत्रिका त्याबरोबरच पदवी प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने हे मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.’ डॉ. महेश काकडे म्हणाले, ‘आधीच्या मशिनमध्ये एका वेळी केवळ पाचशे पेपर लोड केले जात होते. मात्र, यामध्ये एका वेळी आठ हजार पेपर लोड करता येतात. तसेच यामध्ये प्रिंटिंगची गुणवत्तादेखील वाढणार आहे. तसेच ‘इमेज प्रोसेसिंग’ जलद होणार असल्याने वेळ वाचणार आहे.’

विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची छपाई अधिक जलद होण्याच्या दृष्टिकोनातून या प्रिंटिंग मशिनची खरेदी करण्यात आली आहे. परीक्षा विभाग अधिकाधिक सक्षम करण्याचा आमचा मानस आहे.
                      – डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

Back to top button