मोशी : पुढारी वृत्तसेवा : पुणे – नाशिक महामार्गालगत मोशी हद्दीत बोराटेवस्ती, संजय गांधीनगर भागातील उघडी गटारे तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, परिसरातील गटारे बंदिस्त करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. मोशी परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. त्यानुसार येथील नागरिकांना पालिकेने मूलभूत सुविधा पुरविणे आवश्यक आहे; मात्र याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
मोशी परिसरात अद्यापही काही ठिकाणी उघडी गटारे आहेत. या गटारांत कचरा टाकण्यात येतो; तसेच गवतही वाढलेले आढळते. त्यामुळे गटारे तुंबली आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेले महिनाभर पाऊस हजेरी लावत असल्याने परिसरातील गटारे पाण्याने तुडुंब झाली आहेत. त्यामध्ये गाळ साचल्याने गटारे तुंबून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
उघड्यावरील गटारांतून मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत असते. हे सांडपाणी महामार्गावर पसरते. त्यामुळे दुचाकी वाहने घसरण्याच्या घटना घडतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. बोराटेवस्ती परिसरातील गटारे बंदिस्त करावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून अनेक वेळा करण्यात आली आहे; परंतु रस्ता रुंदीकरणाचे कारण देत पालिका हात वर करत आहे. महामार्गलगतची गटारे अजूनही बंदिस्त का करण्यात येत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.