राजगुरुनगर : हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकासाठी सहकार्य; राज्यपालांचे आश्वासन


हुतात्मा राजगुरू यांच्या 114 व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील व इतर.
हुतात्मा राजगुरू यांच्या 114 व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील व इतर.

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा: 'क्रांतिकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले असून, त्यांच्याबद्दल देशवासीयांना प्रचंड आदर आहे. ही श्रद्धा कायम राहण्यासाठी क्रांतिकारकांचा इतिहास शालेय विद्यार्थ्यांना शिकवला गेला पाहिजे. यातून अपार देशभक्तीचे शाश्वत बीज रुजले जाईल,' असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले. दरम्यान, राजगुरू यांच्या स्मारकासाठी सरकारकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात होणार्‍या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या 114 व्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 24) राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्याला राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यानंतर रिद्धीसिद्धी कार्यालयात झालेल्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते.

सुरुवातीला एस. टी. बसस्थानक आवारातील क्रांतिकारक राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या पुतळ्याला राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या राजगुरू वाडा, आपटे वाडा येथे त्यांनी भेट दिली. राज्यपाल कोश्यारी यांनी आहुती देण्याची आमची परंपरा आहे. माझे नाही हे सारे देशाचे आहे, अशी भावना प्रत्येकाने अंगिकारल्यास राजगुरूंचे स्वप्न साकार होईल, असेही त्यांनी सांगितले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण चांभारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, खेडचे प्रभारी उपविभागीय अधिकारी सारंग कडोलकर, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील आदी उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू यांचे नातू सत्यशील राजगुरू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

सत्यशील राजगुरू, हुतात्मा भगतसिंग यांचे वंशज किरणजितसिंग, हुतात्मा सुखदेव यांचे वंशज अनुज थापर, हुतात्मा बाबू गेनू यांचे वंशज किसन सैद, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे यांचा मान्यरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हुतात्मा राजगुरू यांच्या कार्यावर तयार करण्यात आलेल्या चित्रफितीचे पुन:प्रकाशन या वेळी करण्यात आले. खेड तालुका अमृत महोत्सव संयोजन समितीचे अ‍ॅड. नीलेश आंधळे, बाळासाहेब सांडभोर, अमर टाटीया, नितीन वरकड, अजिंक्य बकरे, अ‍ॅड. मनीषा टाकळकर, आनंद गावडे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले. मधुकर गिलबिले यांनी आभार मानले.

हुतात्मा राजगुरूंचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचणे गरजेचे आहे. दगडांच्या स्मारकांपेक्षा चालती बोलती स्मारके प्रेरणादायी ठरतील.

                                                        – डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर

खेड तालुक्यात पहिल्यांदा राज्यपालांची उपस्थिती लाभली. सध्याचे सरकार राज्यपाल म्हणतील तसे वागणारे आहे. यामुळे हुतात्मा स्मारकाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा.

                                                                  – दिलीप मोहिते पाटील, आमदार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news