पुणे शहर तापाने फणफणले! डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले | पुढारी

पुणे शहर तापाने फणफणले! डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना शहरात डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुनगुनियाचा उद्रेक वाढत आहे. प्रत्येक घरातील एखाद-दुसर्‍या व्यक्तीला घसा, डोकेदुखी, खोकला, सर्दी व अंगदुखीची लक्षणे जाणवत असल्याचे चित्र शहरभर आहे. कोरोनाचा अनुभव पाठीशी असल्याने नागरिक आरोग्याची काळजी घेत असतानाही साथ आजारांचा फैलाव वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. परिणामी, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागही ‘मिशन मोड’वर काम करीत आहे.

काय काळजी घ्याल?
डासांपासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवा.
ताप येताच वैद्यकीय सल्ला घ्या. कोणताही ताप अंगावर काढू नका.

पाच दिवसांत शंभराहून अधिक रुग्ण
शहरात चार दिवसांत 100 हून अधिक स्वाईन फ्लूचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरात जानेवारी 2022 पासून 8268 संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 4109 जणांना टॅमी फ्लू देण्यात आले आणि नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. यामध्ये 617 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. रुग्णालयात 976 संशयित आणि 617 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल होते.

त्यापैकी 361 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या आठ महिन्यांमध्ये स्वाईन फ्लूच्या 11 रुग्णांचा मृत्यू झाला. प्रादूर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तीन वर्षांत प्रथमच स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांची अधिक काळजी घ्यावी, असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 81 गावांत प्रादूर्भाव
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील 81 गावांमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव होत आहे. ही गावे संवेदनशील आणि अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ‘मान्सूननंतरचा काळ या गावांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या गावांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते,’ अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके यांनी दिली.

Back to top button