पुणे : वडापुरीतील महिलांचे इंदापुरात आंदोलन | पुढारी

पुणे : वडापुरीतील महिलांचे इंदापुरात आंदोलन

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : वडापुरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिवाजी फुगे यांची व ग्रामपंचायतीच्या कारभाराची खातेनियाह चौकशी करावी, या मागणीसाठी गावातील महिलांनी इंदापूर पंचायत समितीसमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

शासनस्तरावरील विविध योजनांची अंमलबजावणी न करणे, घरपट्टी पाणीपट्टी भरूनसुद्धा ठरावाची प्रत आणि प्रस्तावावर सह्या न देणे, तसेच महिलांचा अपमान होईल असे बोलणे, याबाबतीत फुगे यांच्याविरोधात महिला ग्रामपंचायत सदस्यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रार अर्जातील मुद्द्यांची खातेनिहाय चौकशी करून चौकशी करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.

ग्रामपंचायत सदस्या अंबिका बागल, श्रीनाथ विकास सोसायटीचे सदस्य गोरख चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
रोजगार हमी योजनेअंतर्गत पाणंद रस्त्यांच्या कामासाठी सामूहिक मजुरांचा मागणी अर्ज असतानाही त्यांना मजुरीपासून दूर ठेवून ट्रॅक्टर, जेसीबीच्या सहाय्याने हे काम करणे, ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित न राहाणे, ग्रामसभा तहकूब करणे, मासिक मीटिंग न घेणे यासह विविध तक्रारी फुगे यांच्याविरोधात करण्यात आल्या आहेत. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी व त्यात ते दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करून यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली आहे.

संबंधित ग्रामसेवकाची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी सहायक गटविकास अधिकारी डॉ. राम शिंदे आणि विस्तार अधिकारी मोरे यांची समिती गठीत केली आहे. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

– विजयकुमार परीट, गटविकास अधिकारी, इंदापूर पं. स.

Back to top button