पुणे : ऊस फवारणीसाठी ड्रोनला प्राधान्य | पुढारी

पुणे : ऊस फवारणीसाठी ड्रोनला प्राधान्य

टाकळी हाजी, पुढारी वृत्तसेवा : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी व डॉ. विलास कांदळकर यांनी आपल्या शेतात अभिनव प्रयोग करीत उसावर ड्रोनद्वारे फवारणी केली आहे. ड्रोन फवारणीबाबत परिसरात चर्चा होत आहे.

ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे वेळ आणि औषधाची बचत होते. बारा महिन्यांच्या या उसाला (को – 86032) सात मिनिटांत बारा लिटर पाणी, एक लिटर या प्रमाणात दोन विविध रसायने आदींच्या मिश्रणाची फवारणी करण्यात आली. हातपंपाद्वारे फवारणी करताना औषधे अंगावर उडतात. शेतकर्‍यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आरोग्यासाठी फलदायी व वेळेची बचत म्हणून ड्रोनद्वारे फवारणी फायद्याचे ठरते.

साधारण ड्रोन फवारणीसाठी एकरी आठशे रुपये खर्च येतो. पंधरा मिनिटांत एक एकर फवारणी केली जाते. यासाठी भीमाशंकर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे तसेच सोमेश्वर दीक्षित यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

ऊसवाढ झाल्यास ऊस पिकाला अँसोटोबॅक्टर फवारणी करणे आवश्यक असते. परंतु हातपंपाने उसाची फवारणी करता येत नाही. तसेच जमिनीतून ऊस पिकाला योग्य मूलद्रव्ये मिळत नाही. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी केल्यास उसाच्या पानांमधून मूलद्रव्ये चांगल्या प्रकारे मिळाल्याने उसाची वाढ जोमाने होण्यास मदत होते, असे डॉ. विलास कांदळकर यांनी सांगितले.

Back to top button