उद्धव ठाकरे यांचा डावा हातही जेलमध्ये जाणार, किरीट सोमय्या यांनी साधला अनिल परब यांच्यावर निशाणा | पुढारी

उद्धव ठाकरे यांचा डावा हातही जेलमध्ये जाणार, किरीट सोमय्या यांनी साधला अनिल परब यांच्यावर निशाणा

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांचा उजवा हात जेलमध्ये गेला. आता डावा हात जेलमध्ये जाईल. समजने वाले को इशारा काफी है, असे सूचक वक्तव्य करीत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि माजी मंत्री अनिल परब यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. लोणावळा शहर भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अनिल परब यांनी दापोली येथील समुद्र किनारा लगत केलेल्या बेकायदा रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याचे आदेश केंद्राने नुकतेच दिले असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

परब यांचे बेकायदा बांधकाम पाडले जाणार म्हणून आम्ही शांत बसणार नाही, तर या जागेच्या खरेदी व बांधकामासाठी एवढे पैसे कोठून आले याचीही चौकशी केली जाईल. या संदर्भात लवकरच फडणवीस-शिंदे सरकार पुढील निर्णय घेणार असल्याचे सोमय्या यांनी यावेळी सांगितले. लोणावळा शहरातील महिला मंडळ हॉल याठिकाणी शहर भाजप कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोमय्या यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना मुंबई कोविड सेंटरच्या कामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत हा पैसा कुठून कुठे गेला हे लवकरच जाहीर करणार अशी स्पष्टोक्ती सोमय्या केली.

याप्रसंगी माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, माजी नगरसेवक देविदास कडू, ब्रिंदा गणात्रा, रचना सिनकर, राजाभाऊ खळदकर, बाळासाहेब जाधव, विशाल पाडाळे, ललित सिसोदिया आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यादरम्यान शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व मागील सलग दोन वेळचे नगरसेवक सुनिल इंगूळकर, काँग्रेसच्या माजी नगरसेविका कांचन गायकवाड, भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हा सचिव प्रफुल्ल काकडे, उद्योजक सुधिर पारिठे, अभय पारेख व सहकारी, प्रतिक बोरकर यांच्यासह भांगरवाडी, तुंगार्ली, न्यू तुंगार्ली, खंडाळा, लोणावळा बाजारपेठ या भागातील पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

लोणावळा शहरात पुन्हा भाजपचाच नगराध्यक्ष होणार यात शंका नाही; परंतु आपल्याला यावेळी कोणाच्याही कुबड्यांवर अवलंबून राहयचे नाही. लोणावळा नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवायची असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी सांगितले. याकरिता कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन केले.

Back to top button