‘पन्नास खोके ऑल ओके’ करत सत्ता ओरबाडून घेतली : खा. सुळे | पुढारी

'पन्नास खोके ऑल ओके' करत सत्ता ओरबाडून घेतली : खा. सुळे

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : ‘पन्नास खोके ऑल ओके’ म्हणत सत्तेत आलेल्या ‘ईडी’ सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीही घेणे- देणे नाही. ‘ईडी’ सरकारने सत्तेसाठी साम, दाम, दंडचा वापर करत सत्ता ओरबडून घेतली असून यातून राज्यातील जनता भरडली जात असल्याची टीका खा. सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली. करंजे(ता. बारामती) येथील प्रसिद्ध सोमेश्वर मंदिरात बुधवारी(दि.२४) रोजी सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शिवलिंगाची पूजा, आरती, अभिषेक आदी विधी करण्यात आले यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माजी सभापती निता फरांदे, सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे, खरेदी विक्री संघाचे संचालक विक्रम भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
विधानभवनात शेतकरी आत्महत्या करत असताना शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा सरकार करत नसल्याचेही सुळे म्हणाल्या. महागाईवर सरकार काहीही बोलायला तयार नाही.

सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा भागत नसून बीजेपी सरकार मुळ मुद्याला बगल देत असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील पोलिस चांगले काम करत आहेत शिवाय निर्भया पथकाचे काम चांगले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष याकामी पोलिसांना सहकार्य करत आहे. सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रताप भांडवलकर, सचिव राहुल भांडवलकर आणि विश्वस्त समितीच्या वतीने खा. सुप्रिया सुळे यांचा सत्कार करण्यात आला.

Back to top button