

राजगुरूनगर :पुढारी वृत्तसेवा क्रांतिकारकांच्या सशस्त्र क्रांती करून बलिदान देण्याच्या कल्पनेने व कृतीने देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले. भारताच्या मातीला स्वतंत्रतेचा सुगंध लाभावा म्हणून हसत हसत फासावर जाणाऱ्या हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांचे पवित्र चरित्र युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन साताऱ्याचे खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल डॉ श्रीनिवास पाटील यांनी केले.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त राजगुरूनगर येथे बुधवारी (दि २४) अभिवादन करण्यात आले.
पुणे नाशिक महामार्गालगत बस स्थानक आवारातील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या स्मृतीशिल्प स्थळी पुतळ्याला डॉ. श्रीनिवास पाटील, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी बोलताना डॉ. पाटील यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले.
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड. देवेंद्र बुट्टे पाटील, हिरामण सातकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, अरुण चांभारे, मंगल चांभारे,विजय डोळस, कैलास सांडभोर, कोंडीभाऊ टाकळकर, एड मुकुंद आवटे, बाळासाहेब सांडभोर, ॲड. गणेश सांडभोर, नितीन सैद, अशोक दुगड, कुंडलीक कोहिणकर, सुभाष होले, अँड. मनीषा पवळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील एन सी सी पथकाने मानवंदना दिली. सूत्रसंचालन सुदाम कराळे यांनी केले.