आकाशगंगेत नृत्याचा आभास! | पुढारी

आकाशगंगेत नृत्याचा आभास!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आकाशात ता-यांचे नृत्य पाहायला मिळाल्यास आपल्याला ते खरे वाटणार नाही. मात्र, आकाशगंगेत असेही काही घडू शकते, याचा शोध पुण्यातील भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संशोधकांनी लावला आहे. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) खोडद येथील अद्ययावत जायंट मीटरवेव रेडिओ टेलिस्कोपच्या (यूजीएमआरटी) साहाय्याने संशोधकांनी हे संशोधन केले आहे.

टँगोसदृश नृत्याचा आभास निर्माण करणार्‍या जुळ्या रेडिओ आकाशगंगांचा (कॉस्मिक टँगो) शोध लावणा-या पुण्याच्या संशोधकांच्या टीममध्ये मुंबईच्या सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सचे प्रा. गोपाल कृष्ण, एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्समधील दुस्मंता पात्रा, नैनितालच्या आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्समधील अमितेश तोमर, बंगळूरच्या भारतीय खगोलभौतिकी संस्थेतील रवी जोशी यांच्यासह शांघायमधील क्स यांग, बीजिंगमधील एल. सी. हो, इविंगमधील पी. जे. विटा यांचा समावेश आहे. या संशोधनाचा शोधनिबंध मंथली नोटीस ऑफ द रॉयल स्ट्रॉनॉमिकल सोसायटी या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. आकाशगंगेच्या तारकीय केंद्रस्थानी भव्य वस्तुमानाची कृष्णविवरे असल्याचे मानले जाते. त्यांचे वस्तुमान अनेक दशलक्ष ते अब्जावधी सूर्याच्या बरोबरीने असते. ‘सक्रिय’ अवस्थेत प्रवेश केल्यावर ही कृष्णविवरे त्यांच्या स्वत:भोवती फिरण्याच्या अक्षाच्या दिशेने चुंबकीय सापेक्षतावादी (रिलेटिव्हिस्टिक) प्लाझ्माचे दोन विरुद्ध संयोगित ‘जेट्स’ बाहेर टाकतात.

काही दशलक्ष वर्षांच्या आकाशगंगेच्या सक्रिय आयुर्मानात दोन सापेक्षतावादी जेट मूळ आकाशगंगेपासून विरुद्ध बाजूने लाखो प्रकाशवर्षापर्यंत वाढतात. सामान्यत: चुंबकीय क्षेत्रात बुडालेले हे सापेक्षतावादी इलेक्ट्रॉन/पॉझिट्रॉनचे जेट्स रेडिओ दुर्बिणीद्वारे शोधले जातात. कारण ते ‘सिंक्रोट्रॉन’ नावाच्या प्रक्रियेद्वारे रेडिओ-लहरींचे तीव—तेने विकिरण करतात. साधारणतः बर्‍याच मोठ्या आकाशगंगा डंबेल आकाराच्या जोडीने आढळतात आणि प्रत्येक आकाशगंगा सापेक्षतावादी प्लास्मा जेट उत्सर्जित करण्यास समर्थ असतात.

त्यामुळे अशा अनेक डंबेल प्रणालींमध्ये दोन्ही आकाशगंगा स्वतः जेट उत्सर्जित करताना निरीक्षणात क्वचित का आढळतात, त्याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ‘जे 104454354055’ असे याला नाव देण्यात आले असून, या लंबवर्तुळाकार जुळ्या रेडिओ आकाशगंगा स्वतंत्र सापेक्षतावादी जेट्ससहीत एकमेकांच्या गुरुत्वमध्याभोवती परिभ—मण करताना दिसत आहेत. सापेक्षतावादी जेट्सच्या जोडीच्या आपापसातील हालचालीमुळे टँगोसदृश नृत्याचा आभास निर्माण होतो. हे रेडिओ जेट किमान 1.5 दशलक्ष प्रकाशवर्षांपर्यंत पसरलेले दिसतात.

Back to top button