पुणे : निवडणुकीसाठी ‘तारीख पे तारीख’ | पुढारी

पुणे : निवडणुकीसाठी ‘तारीख पे तारीख’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाने सहा आठवड्यांची स्थगिती दिल्याने आता या निवडणुका नक्की कधी होणार? याबाबत संभ्रम अधिकच वाढला आहे. सातत्याने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याने इच्छुक कार्यकर्त्यांंचे टेन्शन आणि निवडणुकीचे बजेट दोन्ही वाढत चालले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील जवळपास 20 हून अधिक महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यांची प्रभागरचना करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता.

त्याचबरोबर वाढलेल्या लोकसंख्येच्या निकषानुसार सदस्यसंख्याही वाढविण्यात आली होती. मात्र, राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने 2017 प्रमाणे सदस्यसंख्या आणि प्रभागरचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला खीळ बसली होती. महापालिकेच्या निवडणुका तीन की चारसदस्यीय प्रभागपद्धतीने होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम कायम असतानाच सोमवारी सर्वोच्च न्यायालयातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने महापालिका निवडणुकीच्या सर्वच प्रक्रियेला सहा आठवड्यांची स्थगिती देण्याचे आदेश दिले.

या प्रक्रियेमुळे आता सर्वच प्रक्रिया पुन्हा थांबली गेली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पुन्हा पुणे शहरात तरी नव्याने चारसदस्यीय प्रभागरचना करण्याची प्रक्रिया न्यायालयाच्या निर्णयामुळे राबविता येणे शक्य होणार नाही. सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा यासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यावरच महापालिका निवडणुकांचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार निवडणुका घेण्याचा आदेश दिला, तर दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबरमध्ये या निवडणुका होतील.

मात्र, शिंदे- फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार चारसदस्यीय प्रभागपद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय झाल्यास पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागेल. त्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल. परिणामी, या निवडणुका थेट जानेवारी महिन्यातच होऊ शकतील. त्यामुळे महापालिका निवडणुकीबाबत सध्या केवळ ‘तारीख पे तारीख’ अशीच अवस्था झाली आहे. त्यामुळे गेल्या दीड ते दोन वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करणार्‍या इच्छुकांवर आता वाट पाहण्याची वेळ आली आहे.

Back to top button