पुणे : कर भरलाय, तरी थकबाकीचा मेसेज ; शहरातील 60 हजारांहून अधिक मिळकतधारकांना मनस्ताप | पुढारी

पुणे : कर भरलाय, तरी थकबाकीचा मेसेज ; शहरातील 60 हजारांहून अधिक मिळकतधारकांना मनस्ताप

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचा मिळकतकर भरलेला असतानाही थकीत मिळकतकर भरण्याचे मेसेज (एसएमएस) आल्याने पुणेकर करदात्यांमध्ये मंगळवारी प्रचंड गोंधळ उडाला. अनेकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करीत महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढले. त्यावर, ‘हे मेसेज तांत्रिक चुकीमुळे मिळकतधारकांना गेले आहेत. जे थकबाकीदार आहेत, त्यांनी कर भरून कारवाई टाळावी,’ असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले.

महापालिका हद्दीतील मिळकतींना महापालिकेच्या मिळकतकर आकारणी व वसुली विभागाकडून कर लावला जातो. वेळेत कर भरणार्‍यांना करात सवलत मिळते, तर कर न भरणार्‍यांना दंड लावला जातो. थकीत मिळकतकर भरण्यासाठी सोमवारपासून मिळकतकर विभागाच्या वतीने 60 हजारांहून अधिक मिळकतधारकांना कर भरण्यासाठी मेसेज पाठविण्यात आले आहेत. या मेसेजद्वारे मिळकतधारकांनी यापूर्वी घरमालकांना सर्वसाधारण करामध्ये 40 टक्के सवलत देण्यात येत होती, ती रद्द केल्याने कराची संपूर्ण रक्कम भरावी, असे नमूद करण्यात आले आहे. विशेष असे की, ज्या मिळकतधारकांनी यापूर्वी कर भरला आहे, त्यांनाही मेसेज गेल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आहे. कर भरल्यानंतरही मेसेज आलेल्यांपैकी काहींनी मिळकत कर विभागाशी संपर्क साधला. या संदर्भात आयुक्त विक्रम कुमार यांनी तांत्रिक चुकीमुळे मेसेज गेल्याचे सांगितले.

97 हजार फ्लॅटधारकांची सवलत काढली
राज्य शासनाने पुणे महापालिकेच्या मिळकतकरातील 40 टक्के सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या नागरिकांचे दोन फ्लॅट आहेत किंवा भाडेकरू ठेवला आहे अशांची 40 टक्के सवलत काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन संस्थांकडून केलेल्या सर्वेक्षणात अनेक त्रुटी असतानाही हा अहवाल स्वीकारण्यात आला. अहवालानुसार 97 हजार फ्लॅटधारकांची 40 टक्के सवलत काढण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी 33 हजार जणांना 2019 ते 2022 या तीन वर्षांच्या फरकाची रक्कम पाठवली. सोमवारी (ता. 22) 60 हजार जणांना फरकाच्या रकमेचा मेसेज पाठविला. नियमित कर भरून देखील हजारो रुपयांची थकबाकी दाखवून ती वसूल केली जात असल्याने नागरिकांनी याविरोधात संताप व्यक्त केला आहे. त्याविरोधात काही जणांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडेही तक्रार केली आहे.

Back to top button