पुणे : डांबरी रस्त्यावर खड्ड्यात माती-मुरमाची मलमपट्टी | पुढारी

पुणे : डांबरी रस्त्यावर खड्ड्यात माती-मुरमाची मलमपट्टी

केडगाव, पुढारी वृत्तसेवा : डांबरी रस्त्यावर पावसाने पडलेल्या खड्ड्यात माती-मुरूम टाकण्याचा अभिनव प्रयोग दौंड सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत सुरू करण्यात आला आहे. या ‘अर्थ’पूर्ण मलमपट्टीमुळे सर्वच अचंबित झाले आहेत.

रस्त्यावरील खड्ड्याांमुळे अपघातासह वाहनांची हानी होत होती. आता त्याच खड्ड्यात मातीमिश्रित मुरूम टाकल्याने चिखलामुळे खड्ड्याबाहेरही वाहने घसरण्याचा त्रास होणार आहे. ‘आगीतून उठून फुफाट्यात पडण्या’सारखा हा प्रकार घडला आहे. दौंड तालुक्यातील केडगाव ते चौफुला या मार्गावर हा मातीमिश्रित मुरमाचा अभिनव प्रयोग दौंडचे सार्वजनिक बांधकाम खाते खड्डे बुजविण्यासाठी राबवत आहे.

हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असून अहमदनगर, जालना, मनमाड, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरकडे जाणारी वाहने या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर जातात. त्यामध्ये जड वाहने जास्त असतात. या खड्ड्यांचा आणि त्यानंतर ते ज्या अभिनव पध्दतीने बुजविले जात आहेत, त्याचा त्रास अवजड वाहनांपेक्षा जास्त दुचाकी आणि हलक्या वाहनांना होत आहे.

दौंड बांधकाम उपविभागाने खड्डे मातीमिश्रित मुरमाने बुजविल्याने या माती मुरमाची धूळ दुचाकी वाहनचालकांच्या डोळ्यांत उडू लागली आहे. सध्या पाऊस नाही आणि येणारच नाही, अशी खात्री कुणी देईल, अशी व्यक्ती आणि यंत्रणा नाही. पाऊस आल्यावर खड्डे पूर्वी पाण्याने भरलेले असायचे. ते आता चिखलाने भरणार आहेत. हा चिखल दुचाकी घसरून पडण्यास पुरेसा असतो. हा प्रकार साधारण लोकांना माहीत असतो. मात्र, या बांधकाम विभागातील अभियंता असणार्‍या अधिकारी आणि त्यांच्या प्रशासनाला का समजत नाही, असा खरा प्रश्न आहे.

उर्मट उत्तर देत फोन बंद

याबाबत विभागाचे अधिकारी माळशिकरे यांना विचारले असता त्यांनी उत्तर देणे सोडा ‘उलट मला माहीत नाही’ असे उर्मट उत्तर देत फोन बंद केला आहे.

Back to top button