पुणे : मंचर पोलिसांनी चोरट्याला पकडले

पुणे : मंचर पोलिसांनी चोरट्याला पकडले

पारगाव, पुढारी वृत्तसेवा : मंचर (ता. आंबेगाव) शहरात विविध दुकानांत चोरी करून 56,150/- रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्याला मंचर पोलिसांनी पकडले. चोरट्याचे इतर साथीदार पळून गेले. सदर घटनांबाबत सुनील बबन खेडकर (रा. मंचर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी खेडकर यांच्या श्री मेन्सवेअर कलेक्शन या दुकानाचे दि. 21 ऑगस्ट रोजी रात्री 3:30 वाजता शटर उचकटून चोरट्यांनी 4,150/- रुपयांचे शर्ट व रोख रक्कम चोरली होती. तसेच प्रशांत मोरडे यांचे हॉटेल स्टार बारमधून 20,000/- रोख रक्कम, साहित्य, दिलीप महाजन यांचे श्रीकांत किराणा स्टोअर्समधून 7,000/- रुपये रोख रक्कम, सलमान आत्तार यांची 25,000/- रुपये किंमतीची पल्सर मोटारसायकल असा एकूण 56,150/- रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

सदर घटनांच्या तपासासाठी पोलिस रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना विकास थिएटरजवळ 4 ते 5 संशयित इसम दिसले. पोलिसांना पाहून ते पळून जात असताना पोलिस कॉन्स्टेबल दिनेश माताडे, सुनील काटे, पोलिस हवालदार गणपत डावखर यांनी एकास पाठलाग करत पकडले. चौकशीवेळी त्याने त्याचे नाव मोहसीन हानिफ शेख (रा. विश्रांतवाडी प्रतीकनगर, येरवडा, पुणे) असे सांगितले.

पळून गेलेल्या इसमांची नावे सागर गायकवाड, यश, सागर व एका मित्राचे नाव माहिती नाही असे सांगितले. तसेच मंचर शहरात थोड्या वेळापूर्वी पाच ठिकाणी चो-या केल्या असून यशने मोटारसायकल चोरून नेल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक राजेंद्र हिले तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news