पुणे : एक्सचेंज मॅनेजरकडून 8 लाखांचा अपहार | पुढारी

पुणे : एक्सचेंज मॅनेजरकडून 8 लाखांचा अपहार

बारामती, पुढारी वृत्तसेवा : येथील महिंद्रा शोरूम भरणे मोटर्स येथे एक्सचेंज मॅनेजरने जुन्या वाहनांच्या विक्री व्यवहाराची 8 लाखांची रक्कम शोरूमच्या खात्यात न भरता तिचा अपहार केला. याप्रकरणी गणेश भुजंग होले (रा. पणदरे, ता. बारामती) याच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शोरूमकडून जनरल मॅनेजर रितेश प्रल्हाद आटोळे यांनी फिर्याद दिली. होले या ठिकाणी ऑगस्ट 2019 पासून एक्सचेंज मॅनेजर या पदावर काम करतात. मार्च 2022 मध्ये सबडिलर सुरेश भिसे यांनी होले यांच्याकडून वाहनांची कागदपत्रे मिळत नसल्याचे कळविले. त्यावरून फिर्यादीने खरेदी-विक्री रजिस्टर तपासले असता भिसे यांच्यामार्फत होले यांनी हे वाहन विक्री केले असले, तरी त्याची 1 लाख 10 हजारांची रक्कम शोरूमच्या खात्यावर भरली नसल्याचे दिसून आले.

संशय बळावल्याने रजिस्टरची पाहणी केली असता 1 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत विविध तेरा वाहनांच्या खरेदी-विक्रीची रक्कम होले यांनी शोरूमच्या खात्यावर भरली नसल्याचे दिसून आले. या व्यवहाराची एकूण रक्कम 8 लाख 6 हजार रुपये इतकी आहे. ही रक्कम त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरत अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Back to top button