पुणे : राजुरीत आढळले बिबट्याचे बछडे | पुढारी

पुणे : राजुरीत आढळले बिबट्याचे बछडे

बेल्हे, पुढारी वृत्तसेवा : राजुरी (ता. जुन्नर) येथील तागडामळा शिवारात सोमवारी (दि. 22) दुपारी बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. वनविभागाने बछड्यांना ताब्यात घेऊन त्याच ठिकाणी ठेवले आहे. मादी त्याठिकाणी येऊन बछड्यांना घेऊन जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

तागडामळा शिवारात असिफ अब्दुल्ला महालदार यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. मजूर ऊसतोडणी करीत असताना त्यांना फडात बिबट्याचे दोन बछडे दिसले. बछड्यांना पाहताच बिबट्या आसपास असावा, या भीतीने मजुरांनी धूम ठोकली. ग्रामस्थांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वनकर्मचारी व वनाधिकार्‍यांना कळविले.

वनकर्मचारी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. मादी बिबट्या जवळपासच असण्याची शक्यता होती. तसेच ती चिडून आक्रमक होण्याची शक्यताही होती. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार दोन्ही बछड्यांचे आईसोबत मिलन घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजता दोनही बछडी क्रेटमध्ये ठेवली. तसेच आसपास कॅमेरे लावून ठेवले.

Back to top button