पुणे : कोर्‍हाळे-जिंती पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

File photo
File photo

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील कोर्‍हाळे खुर्द ते फलटण तालुक्यातील जिंतीदरम्यान निरा नदीवर होणार्‍या पुलाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बारामतीच्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीशांनी बांधकामासाठी दिलेले 'जैसे थे'चे आदेश उठवले असून कामाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे या कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

कोर्‍हाळे खुर्द ते जिंती यादरम्यान निरा नदीवर पूल उभारण्याची दोन्ही तालुक्यातील जनतेची गेली अनेक वर्षांपासूनची मागणी होती. प्रणिता मनोज खोमणे या कोर्‍हाळे खुर्दच्या सरपंच असताना त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन मंत्री अजित पवार व रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून या पुलाचे काम मंजूर झाले होते.

त्यासाठी तीन जागा प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी तांत्रिकदृष्ट्या योग्य व शासकीय निधीची बचत करणारी जागा म्हणजेच गट नंबर 318 व 319 मधील जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केलेली होती. परंतु, सुरुवातीला पुलाला विरोध करणार्‍या काहींनी नंतर पुलाच्या जागेवरून वाद निर्माण केला होता.

यासंबंधी पवार यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती. परंतु, त्यांनी शहानिशा करत हीच जागा योग्य असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने काही काळासाठी 'जैसे थे'चा आदेश दिला होता. परंतु, तो आता रद्द केला गेला आहे. याशिवाय बांधकामाला स्थगितीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.

न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे आता भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच पुलाचे बांधकाम सुरू होईल. विरोधकांनी राजकीय द्वेष बाजूला ठेवून विकासकामांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच गोरख खोमणे व डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news