पुणे : माळशेज पट्ट्यात तरकारी पिके पाण्यात | पुढारी

पुणे : माळशेज पट्ट्यात तरकारी पिके पाण्यात

ओतूर, पुढारी वृत्तसेवा : उत्तर पुणे जिल्ह्याच्या टोकावरील माळशेज पट्टा हा दर्जेदार तरकारी पिकांसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातील गावांमधून टोमॅटो, मिरची, सिमला मिरची, वाटाणा, कोबी, फ्लॉवर, कारले यांसारख्या पिकांचे भरघोस उत्पन्न घेतले जाते. मात्र, यंदा मुसळधार पावसाने अधिक काळ सलग हजेरी लावल्याने टोमॅटो, मिरचीसह इतर सर्व तरकारी पिके पाण्यात गेली आहेत.

वारेमाप भांडवली खर्च केलेली पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. अतिपावसामुळे टोमॅटो पिकावर डाऊनी, भुरी, करपा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यंदा जुन्नर तालुक्यात 7 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर टोमॅटो, मिरचीसह तरकारी पिकाची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. पैकी माळशेज पट्ट्यात 3500 हेक्टरवर तरकारी पिकांची लागवड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. माळशेज पट्ट्यात मुसळधार व सलग पाऊस पडत असल्याने ओढे, नाले, नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. सर्व धरणे ओहोरफ्लो झाल्याने उभ्या पिकात पाणी साचून पिके भुईसपाट झाली आहेत. बाजारभाव कमी जास्त झाल्याने शेतकरी आणखीच चिंतेत पडला.

तरकारी पिकांतून अधिक लाभ मिळतो. त्यामुळे अधिक भांडवल वापरून सर्व संकटांचा सामना करीत तरकारी पिकविली होती. मात्र, नैसर्गिक आपत्तीने व विविध रोगांनी विळखा घातल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, फळ काळे पडणे, तिरंगा पडणे, काळे डाग पडणे अशा रोगांनी पिके ग्रासली आहेत. महागडी औषध फवारणी करूनही उपयोग होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

नुकसानभरपाईची मागणी

माळशेज पट्ट्यात खिरेश्वर, तळेरान,पारगाव,मढ, सीतेवाडी, करांजळे,वाटखळ,गवारवाडी,कोल्हेवाडी,सांगणोरे,पिंपळगाव-जोगा, मराडवाडी, कोळवाडी, डिंगोरे, आलमे, बल्लाळवाडी, नेतवड, माळवाडी, उदापूर, मांदारणे, सारणी, पाचघर, चिल्हेवाडी, रोहोकडी, ओतूरसह आळेफाटा ते अणेपर्यंत अतिपावसाने झालेल्या या तरकारी पिकांचे नुकसान पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी माळशेज पट्ट्यातील शेतकरी करीत आहेत.

Back to top button