दापोडी : गणेशोत्सवाच्या तयारीला आला वेग | पुढारी

दापोडी : गणेशोत्सवाच्या तयारीला आला वेग

दापोडी; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश भक्तांच्या तयारीला वेग आला आहे. विविध देखावे साकारण्यासाठी मंडळांनी सजावटीला प्राधान्य दिले असून देखावे तयार करण्याच्या कामाला शहरातील मंडळाकडून सुरुवात झाली आहे. पुणे शहरामधील गणेशोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातील गणेश भक्तांची रीघ असते. सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, काळेवाडी, रहाटणी, भोसरी, आकुर्डी, निगडी, हिंजवडी, वाकड आदी परिसरामध्ये देखाव्यांची परंपरा आहे. त्यामुळे शहरातील विविध मंडळामध्ये देखावे साकारण्यासाठी चुरस असते. त्यामुळे विशेष उपक्रमशील व जनजागृती पर संदेश देणार्‍या देखाव्याला महापालिका प्रशासनाकडून सन्मानित करण्यात येते.

गणेश मंडळाकडून गणेश मूर्तीचे बुकिंग झाले असून काहींचे सुरू आहे. कारागिरांकडून ही गणेश मूर्तीवर रंग कामाचा शेवटचा हात फिरवला जात आहे. मूर्तीवर चार दिवसांच्या काळात अंतिम हात फिरून विक्रीसाठी बाजारातील स्टॉल्समध्ये आणल्या जातात. तसेच कारागीर बनवत असलेल्या कारखान्यावर जाऊन आगाऊ रक्कम देऊन मंडळाकडून मूर्ती बुकिंग करण्यात येत आहेत. मंडळातील सदस्यांनी विविध कार्यक्रम व देखावे साकारण्यासाठी मंडळांतील कार्यकर्त्यांची मोठी लगबग सुरु झालेली दिसून येत आहे.

जनजागृती व गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेणार्‍या देखाव्याला मंडळी दरवर्षी प्राधान्य देतात. मात्र यंदा गणेशभक्त कोणते नवीन देखावे साकारतील याकडे सर्व गणेश भक्तांचे लक्ष लागले आहे. या गणेशोत्सवासाठी सेवाभावी संस्थाकडून व संबंधित महापालिका प्रशासनाकडून शहरातील सर्वच विसर्जन घाटाची स्वच्छतेचे काम सुरू आहेत. विशेषतः लहान मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. शहर पोलिसांकडूनही मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याविषयी आवाहन केले जात आहे.
.

Back to top button