कसबा पेठ : यंदा पर्यावरणपूरक साधनांतून करू बाप्पाची सजावट | पुढारी

कसबा पेठ : यंदा पर्यावरणपूरक साधनांतून करू बाप्पाची सजावट

कसबा पेठ; पुढारी वृत्तसेवा: यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करता येणार आहे. कारण दर वर्षीप्रमाणे यंदाही बुरुड आळीतील सजावटीच्या वस्तूंची दुकाने पर्यावरणपूरक वस्तूंनी भरली आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खरेदीसाठी नागरिकही गर्दी करीत असून, बांबूपासून बनवलेले मखर, कमानी, महालक्ष्मीचे स्टँड, चिकाचे पडदे अशा विविध वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत.शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडईमागील बाजूचा परिसर म्हणजे बुरूड आळी. बांबूपासून बनवलेल्या हस्तकला वस्तूंसाठी बुरूड आळी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे.

वर्षभर येथे बांबूपासून तयार होणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत असते. गौरी- गणपतीच्या काळात या गल्लीला विशेष महत्त्व आहे. येथे पाहिजे त्या आकारात, पाहिजे त्या डिझाइनमध्ये आपल्या पसंतीस पडेल आणि खिशाला परवडणारे असे गौरी-गणपतीसाठी लागणारे सजावटीचे मखर, महालक्ष्मीचे स्टॅन्ड व इतर पर्यावरणपूरक वस्तू जागेवरच बनवून मिळतात. कमानी, नक्षीदार खांब, मंदिरे, बोट, कमळ, शनिवारवाड्याची प्रतिकृती, नारळ, मोदक अशा वेगवेगळ्या वस्तू विविध आकारामध्ये तयार करून मिळतात. विशेषत: सजावटीसाठी लागणारे मखर बांबूपासून व बॅटम पट्ट्यांपासून बनवून मिळतात.

वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूपासून बनवलेले वजनाने हलके आणि आकर्षक असे मखर येथे बनवून मिळतात. घरगुती गणेशोत्सवासाठी आणि गौरीला लागणार्‍या सजावटीसाठी बांबूपासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तूंना पुणेकरांची विशेष पसंती असते. त्यामुळे गणेशोत्सव आणि गौरीच्या काळात बुरूड आळीत पुणेकरांची पावले वळू लागतात. बांबूपासून बनवलेल्या वस्तूंसाठी बुरूड आळी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. झाडू, खराटे, पायपुसणी, चिकाचे पडदे, शिड्या, गृहोपयोगी साहित्य येथे वर्षभर मिळत असते. सणासुदीच्या काळात परिसरातील बोहरी आळी, रविवार पेठेत नागरिक खरेदीसाठी आल्यावर या परिसराला आवर्जून भेट देतात.

बांबूपासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तूंचे सरासरी दर
बांबू कमान : 100 – 300
सिंहासन : 100 – 180
नारळ : 400-1000
मोदक : 300-800
होडी : 100-180
कमळ : 200-500
महिरप (कमान) : 200-1500
झोपाळा : 1000-2000
झोपडी : 3500 पासून पुढे
मोर – 600-1200

बुुरुड गल्लीत बांबूपासून बनवलेल्या हस्तकला विक्रीसाठी 25 दुकाने आहेत. येथील बांबू कोकणातून येतो. मोठे व्यापारी ते घेतात आणि त्यांच्याकडून आम्ही पाहिजे तसा घेतो. बांबूचे साहित्य पर्यावरणपूरक व इतर सजावटपूरक साहित्यपेक्षा कमी पैशात मिळते. त्यामुळे सणासुदीच्या काळात येथील वस्तूला विशेष मागणी आहे.

                                                           – अनंता मोरे, बांबू विक्रेते, बुरुड गल्ली.

Back to top button