‘खडकवासला’त थेट मैलापाणी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत कबुली | पुढारी

‘खडकवासला’त थेट मैलापाणी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत कबुली

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: पुणे शहर व जिल्ह्यातील जवळपास एक कोटी लोक पिण्यासाठी पाणी वापरत असलेल्या खडकवासला धरणात धरणक्षेत्रातील गावांतील घनकचरा, मैलापाणी, सांडपाणी तसेच रसायनयुक्त पाणी विनाप्रक्रिया थेट खडकवासला धरणात येत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि. 22) प्रशासनाला दिले. आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी खडकवासलातील पाणी विनाप्रक्रिया मिळणार्‍या मैला, रासायनिक सांडपाणी, घनकचर्‍यामुळे प्रदूषित होत असल्याचे मान्य केले. त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा परिषदेला मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

आमदार तापकीर म्हणाले की, अलीकडच्या काळात खडकवासला धरणक्षेत्रात लोकसंख्या वाढली आहे. धरणाच्या दोन्ही तीरांवरील सांगरुण, मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द, गोर्‍हे खुर्द, गोर्‍हे बुद्रुक, खानापूर, मालखेड, कुडजे, डोणजे आदी गावांतील मैलापाणी, सांडपाणी, घनकचरा, रासायनिक पाणी थेट खडकवासला धरणात मिसळते. त्यामुळे पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या तसेच प्राणी, पक्षी, वनस्पती आदींवर विपरीत परिणाम झाला आहे का? तसेच प्रदूषण रोखण्यात दुर्लक्ष करणार्‍या शासकीय यंत्रणेवर कारवाई करण्यात आली आहे का? अशी विचारणा करण्यात आली होती. जवळपास एक कोटी नागरिकांची तहान खडकवासला धरण भागवत आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज आहे, असे तापकीर यांनी स्पष्ट केले.

Back to top button