पुणे : हॉटेल बुक करण्याच्या बहाण्याने ओटीपी शेअर करण्यास भाग पाडून तरुणीची सायबर चोरट्यांनी 89 हजार 879 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी नवी मुंबई येथील 27 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ह्या एका खासगी कंपनीत नोकरी करतात.
कंपनीच्या कामासाठी त्यांना पुण्यात एक दिवसासाठी हॉटेल बुक करायचे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन संकेतस्थळावरून हॉटेल बुक करण्याची प्रक्रिया केली. त्या वेळी सायबर चोरट्यांनी त्यांना आपल्या जाळ्यात खेचून बँक खात्याचा गोपनीय क्रमांक शेअर करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून तसेच वडील व मित्राच्या क्रेडिट कार्डवरून चोरट्यांनी वेळोवेळी 89 हजार 879 रुपये काढून फसवणूक केली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत आहेत.