पुणे : ‘विज्ञान’चा कटऑफ 92 टक्क्यांवर; तिसर्‍या फेरीतही कटऑफमध्ये घसरण नाही | पुढारी

पुणे : ‘विज्ञान’चा कटऑफ 92 टक्क्यांवर; तिसर्‍या फेरीतही कटऑफमध्ये घसरण नाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नामांकित महाविद्यालयांतील पात्रता गुण (कटऑफ) तिसर्‍या फेरीतही कमी झालेले नाहीत. विज्ञान शाखेचा कटऑफ तर काही महाविद्यालये वगळता 92 टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांना प्रवेश दुरापास्तच असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील तिसर्‍या फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.

त्यात बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात एसटी प्रवर्गासाठी 59.4 टक्के कटऑफ आहे, तर फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेत ओबीसी प्रवर्गासाठी 90.6 टक्के, तर खुल्या प्रवर्गासाठी विज्ञान शाखेचा कटऑफ 96.4 टक्के आहे. स. प. महाविद्यालयात कला शाखा 93.2 टक्के, वाणिज्य शाखा 90.6 टक्के, तर विज्ञान शाखेत 92.6 टक्के, नौरोसजी वाडिया महाविद्यालयात कला शाखा 86.8 टक्के आणि विज्ञान शाखेत 89.8 टक्के, नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स 84.8 टक्के, सिम्बायोसिस महाविद्यालयात कला शाखेसाठी 94 टक्के, वाणिज्य शाखेसाठी 93 टक्के, श्यामराव कलमाडी महाविद्यालयात कला शाखा 91 टक्के, वाणिज्य शाखा 89.8 टक्के, विज्ञान शाखेसाठी 93.2 टक्के, जय हिंद हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखा 91.4 टक्के, तर विज्ञान शाखा 94.2 टक्के, मॉडर्न महाविद्यालयात कला मराठी शाखेसाठी 71.2 टक्के, वाणिज्य शाखेसाठी 87.4 टक्के, तर विज्ञान शाखेसाठी 92.6 टक्के, आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कला मराठी शाखेसाठी 70.6 टक्के, तर विज्ञान शाखेसाठी 89.8 टक्के गुण आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अकरावीच्या दोन्ही फेर्‍यांचा आढावा घेतला तर तिसर्‍या फेरीत कटऑफ गुण कमी होतील, अशी अपेक्षा पालकांसह विद्यार्थ्यांना होती. प्रत्यक्षात मात्र कटऑफ गुणांमध्ये वाढच झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तिसरी फेरी सुरू झाल्यानंतरही जर विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांच्या आसपास गुण नसतील, तर त्यांनी नामांकित महाविद्यालयांचा नाद सोडलेलाच बरा, असे चित्र दिसून येत आहे.

Back to top button