पुणे : ‘त्या’ विद्यार्थ्यांची पात्रता धोक्यात | पुढारी

पुणे : ‘त्या’ विद्यार्थ्यांची पात्रता धोक्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बीएमसीसी या स्वायत्त महाविद्यालयाने चालू शैक्षणिक वर्षांत प्रथम वर्ष बी.कॉम, तसेच बीबीए या वर्गात बारावीच्या गुणांवर प्रवेश देण्याऐवजी चक्क दहावीच्या गुणांवर दिला. याची तक्रार विद्यापीठ व शिक्षण विभागाकडे केल्यावर या प्रवेशांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दहावीच्या गुणांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची पात्रताच धोक्यात आली आहे. दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पात्रता मान्य कशी करावी? असा प्रश्न विद्यापीठाला पडला आहे.

याप्रकरणी विविध विद्यार्थी आणि सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचालक यांना निवेदन देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसेच, विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संचालकांनीही याची गांभीर्याने दखल घेतली आहे. नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली नसल्यास या विद्यार्थ्यांची पात्रता (इलिजिबिलिटी) ग्राह्य धरता येणार नसल्याचे महाविद्यालयाला कळविले आहे.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश खुरपे, अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे संस्थापक-अध्यक्ष उल्हास अग्निहोत्री, वंचित बहुजन आघाडीचे अतुल झोडगे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास आदींनी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांना निवेदन देऊन शिक्षण हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणार्‍या महाविद्यालयावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

उच्च शिक्षण सहसंचालकांनी मागवला खुलासा
बी.एम.सी.सी. महाविद्यालयाने स्वायत्ततेचा चुकीचा अर्थ घेत बीकॉम,बीबीए,बीसीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भात स्वतंत्र पात्रता निकष ठरविले आहेत. संबंधित प्रक्रिया ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तरतुदीच्या विसंगत असून, संविधानातील कलम 14 चे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसांमध्ये आपले म्हणणे सादर करावे, अशा सूचना उच्च शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी बीएमसीसी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिल्या आहेत.

  • बीएमसीसी महाविद्यालयात प्रथम वर्ष बी.कॉम., बी.बी.ए.ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार

Back to top button