पुणे : पीएमपीने खरेदी केलेल्या नव्या 200 ई-बस येणार कधी? | पुढारी

पुणे : पीएमपीने खरेदी केलेल्या नव्या 200 ई-बस येणार कधी?

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमपीने खरेदी केलेल्या नव्या 200 ई-बस मुदतीत ताफ्यात दाखल करण्यात ठेकेदार अपयशी ठरला आहे. यामुळे पीएमपीचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडत आहे. शिवाय प्रवाशांना गाड्या वेळेत उपलब्ध होत नाहीत. सर्वच मार्गांवरील बसमध्ये तुडुंब गर्दी होत आहे. ही स्थिती पाहता ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होणार आहेत.

शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी
आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पीएमपीला 350 गाड्या देण्यात आल्या आहेत. पीएमपीने या गाड्यांची खरेदी ठेकेदारांमार्फत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी ऑर्डर दिलेल्या 200 ई-बस अद्याप पीएमपीला मिळू शकलेल्या नाहीत. त्यामुळे ऐन उत्सवाच्या काळात प्रवाशांचे हाल होत आहेत. पीएमपीने खरेदी केलेल्या गाड्या दोन-तीन महिन्यांपासून मिळालेल्या नाहीत. बसअभावी काही मार्गांवर वेळेत सेवा उपलब्ध होत नाही. त्यामुळे तुडुंब गर्दीतून प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे.

पीएमपीच्या ताफ्यातील ई-बस
फेम-2 योजनेअंतर्गत आलेल्या ई-बस – 150
दोन्ही महापालिकांनी खरेदी केलेल्या ई-बस- 350
सध्या पीएमपीकडे आलेल्या ई-बस – 300
पीएमपीकडे येणे बाकी असलेल्या ई-बस – 200

ठेकेदाराला दरदिवशी 20 लाखांचा दंड
‘पीएमपी प्रशासनाने ठेकेदाराला गाड्या दाखल करण्यासाठी नियोजित कालावधी दिला होता. ही मुदत संपल्यानंतर वाढवून दिली. मात्र, तरीही ठेकेदाराने बसचा पुरवठा केला नाही. त्यामुळे पीएमपीकडून दिवसाला एका बसकरिता 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. याप्रमाणे 200 गाड्यांचा ठेकेदाराला दिवसाला 20 लाख रुपये दंड ठोठावला जात आहे,’ असे पीएमपी अधिकार्‍यांनी सांगितले.

पीएमपीने फेम-2 योजना आणि दोन्ही महापालिकांच्या मदतीने 500 ई-बसची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी 300 ई-बस पीएमपीकडे आल्या आहेत. 200 ई-बस येणे बाकी आहे. ठेकेदाराला दिलेली मुदतदेखील संपली आहे. त्यामुळे पीएमपीकडून ठेकेदाराला दिवसाला प्रतिबस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येत आहे.

                                    – दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

Back to top button