पुणे : चित्रपट महामंडळाला दोन एकर जमीन दान: अभिनेते विक्रम गोखले यांचे दातृत्व | पुढारी

पुणे : चित्रपट महामंडळाला दोन एकर जमीन दान: अभिनेते विक्रम गोखले यांचे दातृत्व

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘ज्या कलाकारांची कलाकृती पाहण्यात आमची पिढी शिकत गेली. अशा काही कलाकारांची उतारवयातील परिस्थिती वाईट आहे. त्यामुळेच पुण्याजवळील मुळशीतील नाणे गावात दोन एकर जमीन वृद्धाश्रमासाठी चित्रपट महामंडळाला दान दिली,’ असे ज्येष्ठ अभिनेते गोखले यांनी सोमवारी सांगितले. कलावंतांना उतारवयात हक्काचे ठिकाण असावे, या उद्देशाने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि त्यांचे भाचे यशवंत गायकवाड यांनी दोन एकर जमीन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली आहे.

मुळशी तालुक्यात नाणे गाव येथील या जागेत वृद्धाश्रम आणि कलाकारांना सादरीकरणासाठी खुला रंगमंच साकारण्यात येणार आहे. या जागेचा व्यवहार उपनिबंधक कार्यालयात नुकताच पूर्ण करण्यात आला. त्याची कागदपत्रे गोखले यांनी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडे सोमवारी पत्रकार परिषदेत सुपूर्द केली. ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे, रमेश परदेशी आदी उपस्थित होते.

आपल्याला मिळणार्‍या शंभर रुपयातील पंचवीस रुपये आपले नाहीत, असे समजून बाजूला ठेवतो. माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना यशाशक्ती मदत करतो. कोरोना काळात कलाकारांच्या वेदना आणि त्यांची होत असलेली गैरसोय पाहिली. त्यामुळेच उतारवयातील कलाकारांना हक्काची जागा असावी ही जाणीव झाल्याने जमीन देण्याचा निर्णय घेतला.

                                                             – विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते

सुशांत शेलार यांचा पत्रकार परिषदेवर आक्षेप
मेघराज राजेभोसले यांनी अध्यक्ष या नात्याने महामंडळाची सोमवारी अधिकृतपणे पत्रकार परिषद घेतली. मात्र, ही महामंडळाची अधिकृत पत्रकार परिषद नाही. राजेभोसले यांनी यासंदर्भात कार्यकारिणीला कुठल्याही प्रकारची माहिती न देता परस्पर हा निर्णय घेऊन ही पत्रकार परिषद आयोजित केल्याचे सांगत महामंडळाचे अधिकृत अध्यक्ष असल्याचा दावा करणारे सुशांत शेलार आणि कार्यकारिणीने या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेतला आहे. राजेभोसले यांना अध्यक्षपदावरून बहुमताने काढून टाकण्यात आले आहे. विक्रम गोखले यांच्या या बहुमोल कार्याचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. बहुतेक याची कुणकुण लागल्यामुळे राजेभोसले यांनी ही पत्रकार परिषद घाईगडबडीने आयोजित केलेली असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Back to top button