पुणे : ‘अफजलखान वधाचा देखावा सादर करू नका’ | पुढारी

पुणे : ‘अफजलखान वधाचा देखावा सादर करू नका’

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुण्यात एका गणेशोत्सव मंडळास ‘अफजलखानाचा वध’ या विषयावरील जिवंत देखावा दाखविण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारण्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले. कोथरूड येथील संगम तरुण मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 56 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. संबंधित मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना व प्रसंगांवर आधारित देखावा सादर केला जातो.

या वेळी मंडळाने गणेशोत्सवासाठी ‘अफजलखानाचा वध’ या विषयावरील जिवंत देखावा सादर करण्यात येणार असून, त्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र कोथरूड पोलिसांना 11 ऑगस्ट रोजी पाठविले होते. दरम्यान, संबंधित पत्राची दखल कोथरूड पोलिसांनी घेतली. त्याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसमवेत चर्चा झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा देखावा सादर करण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर शिंदे यांना कोथरूड पोलिसांनी पाठविले आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचेही ते म्हणाले. ‘अशा प्रकारच्या देखाव्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा देखावा सादर करण्याची परवानगी नाकारली आहे,’ असे कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पत्रात म्हटले आहे.

Back to top button