भिवडी येथील रस्ता चिखलमय | पुढारी

भिवडी येथील रस्ता चिखलमय

सासवड : पुढारी वृत्तसेवा : भिवडी (ता. पुरंदर) येथील कोडीत- वीर पालखी रस्त्याची पावसामुळे काळूबाई मंदिर ते खोमणेमळा परिसरात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. भिवडी येथील मुख्य रस्ता ते खोमणेमळ्यापर्यंत (राजे उमाजी नाईक समाधी स्थळ) सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याचे भूमिपूजन अनेक राजकीय नेत्यांनी केले. परंतु, आजपर्यंत या रस्त्याचे काम झाले नाही. रस्त्याचे काम गेली अनेक वर्षांपासून रखडले आहे.

सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली असून संततधारेमुळे त्यावर राडारोडा व चिखल पसरला आहे. यामुळे खोमणेमळा ते मुख्य रस्त्यापर्यंत शेतकर्‍यांना चिखल तुडवीत डोक्यावर शेतीमालाची आणावा लागत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना या रस्त्यातून जाताना मोठे कसरत करावी लागत आहे. रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही कारवाई होत नसल्याने येथील ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. या रस्त्यावर सध्या खडी अथवा मुरूम राहिला नाही. यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील शेतकरी बाळासाहेब खोमणे यांनी केली आहे.

भिवडी येथे येत्या 7 सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची 231 वी शासकीय जयंती होत आहे. या वेळी राज्यातील विविध भागातून समाज बांधव येणार असल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे अनेक वर्षांपासून याबाबत मागणी करूनही अद्यापही दखल घेतली नसून संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. -चंद्रकांत खोमणे, राजे उमाजी नाईक यांचे वंशज

Back to top button