निरा-मोरगाव रस्ता पुन्हा खड्ड्यात! कोट्यवधींच्या निधीचा चुराडा | पुढारी

निरा-मोरगाव रस्ता पुन्हा खड्ड्यात! कोट्यवधींच्या निधीचा चुराडा

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  निरा-मोरगाव रस्त्याचे काम अंतिम टप्यात असतानाच गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. निकृष्ट काम झाल्याने ठेकदारांनी जवळपास 27 कोटी रुपयांचा चुराडा केल्याचे वाहनचालक व नागरिकांचे मत आहे.
निरा- गुळुंचे -मुर्टी-मोरगाव या रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून अवघ्या एक महिन्यातच हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने सरकारच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ठेकेदाराने आता रात्रीच्या अंधारात नव्या कोर्‍या रस्त्यावर ठिगळ लावण्याच काम सुरू केले आहे.

बारामतीतील तीन ठेकेदारांनी या रस्त्याचे काम एकत्रित वाटून घेतले होते. मात्र रस्त्याच्या दर्जाबाबत वाहनचालक व नागरिक समाधानी नाहीत. रस्त्याचे काम सुरू झाल्याने गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे समाधान वाहनचालक व ग्रामस्थांना महिनाभरही मिळाले नाही. अनेक दिवस मातीचा धुरळा सोसला, मोठे खड्डे जीवघेणे होते, अनेकांनी प्राण ही गमावलेत, त्यामुळे नवीन रस्ता होत असल्याने परिसरातील गावकरी आनंदी होते.

परंतु, तो आनंद क्षणभंगुर ठरला. ज्यांनी काम घेतले त्यांनी ते नियमानुसार केले नाही. काम करता खडी, दगडी आदी न टाकता मुरूम मिश्रित साहित्य वापरले. त्यामुळे पहिल्याच पावसात या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या रस्त्यावर डांबर टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे चौधरवाडी हद्दीत एका दुचाकीस्वाराने आपला प्राण गमावला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी मिळत असूनही निकृष्ट कामामुळे बारामतीकर त्रस्त झाले आहेत. यावर आता थेट अजित पवार यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Back to top button