वेल्हे : वाहून गेलेल्या भट्टी येथील रस्त्याची दुरुस्ती | पुढारी

वेल्हे : वाहून गेलेल्या भट्टी येथील रस्त्याची दुरुस्ती

वेल्हे : वृत्तसेवा : मुसळधार पावसात भट्टी गावाजवळ वाहून गेलेल्या वेल्हे- केळद रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे केळद तोरणा भागातील एसटी बस सुरू झाली असून, हजारो पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. तोरणा गडाच्या पायथ्याला अतिदुर्गम भट्टी गावाजवळ मुसळधार पावसाने गुरुवारी (दि. 18) रस्ता खचून अर्धा रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे पर्यटकांसह तोरणा-पासली-केळद भागातील नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

एसटी बस, तसेच मोठ्या वाहनांची वाहतूक बंद पडली होती. वाहून गेलेल्या अरुंद रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. याबाबत दैनिक पुढारीमध्ये शनिवारी (दि. 20) वृत्त प्रसिद्ध झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याची दखल घेत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. डोंगर उतार, तसेच शेतातील पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने पाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकण्यात आले आहेत. जेसीबी मशिन, ट्रॅक्टर व मजुरांच्या साहाय्याने दगड मुरुमाने दोन्ही बाजूला भराव करण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे काम करण्यात अडथळे येऊनही सायंकाळी उशिरापर्यंत काम पूर्ण करण्यात आले. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता साईप्रसाद मुंनगिलवार दोन दिवसांपासून या कामावर देखरेख ठेवून होते.

एसटी बससेवा पूर्ववत
रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याने तोरणा भागातील वेल्हे व भोर तालुक्यातील निगडे, कुंबळे, वरोती, पासली आदी दुर्गम खेड्यांंतील एसटी बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. मढे घाट, केळद भागात पावसाळी पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांची गैरसोय दूर झाली आहे.

तोरणा भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूला गटारे खोदून मोर्‍या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी वाहतुकीला धोका नाही. सर्व वाहतूक सुरळीतपणे झाली आहे.
 – संजय संकपाळ, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Back to top button