‘त्या’ पोलिस अधिकार्‍यांची बदली करा अन्यथा गावठी दारूचे कॅन अधिवेशनात नेणार; आ.शेळके यांचा इशारा | पुढारी

‘त्या’ पोलिस अधिकार्‍यांची बदली करा अन्यथा गावठी दारूचे कॅन अधिवेशनात नेणार; आ.शेळके यांचा इशारा

वडगाव मावळ/कामशेत : पुढारी वृत्तसेवा :  अवैध दारू धंद्यांवर तातडीने कारवाई करावी, तसेच अवैध धंद्यांना पाठीशी घालणार्‍या कामशेत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची तातडीने बदली करण्यात यावी, अन्यथा हेच गावठी दारूचे कॅन विधिमंडळ अधिवेशनात नेणार असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी कामशेत पोलिस ठाण्यावर काढण्यात आलेल्या बेधडक मोर्चाचे वेळी दिला.
यावेळी स्वाभिमानी रिपाइंचे अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादीचे विठ्ठलराव शिंदे, अ‍ॅड. रूपाली दाभाडे, दिपाली गराडे, दीपक हुलावळे, तानाजी दाभाडे, आशिष ढोरे आदी उपस्थित होते.

आमदार सुनिल शेळके व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि.21) सकाळी कामशेत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी संबंधित पोलीस निरीक्षकावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारुधंद्यांवरून गोळा केलेल्या गावठी दारुसह राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कामशेत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.

तालुक्यातील गुन्हेगारी वाढण्यासाठी कारणीभूत असलेल्या अवैध दारुच्या धंद्यांना पाठीशी घालणार्‍या पोलिस निरीक्षकाची बदली होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची आक्रमक भूमिका आमदार शेळके यांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता-रोको आंदोलन करण्याचा इशाराही शेळके यांनी यावेळी दिला होता.

आम्हाला रक्षक पाहिजे भक्षक नको, सर्वसामान्य नागरिक तसेच कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी अवैध दारुधंद्यांबाबत तक्रारी करून देखील कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारुधंदे राजरोसपणे सुरू आहेत. याचाच अर्थ या पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्यांना पाठीशी घालत आहेत. ही खूप गंभीर बाब असून अशा पोलीस अधिकार्‍याची तातडीने येथून बदली करावी व चांगल्या पोलीस अधिकार्‍याची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी आमदार शेळके यांनी केली.

मावळ तालुक्यात कोथुर्णे येथे झालेल्या दुर्दैवी घटनेतील मुलीवर अत्याचार करून खून करणारा आरोपी व्यसनाधीन होता. त्यामुळे असे अवैध दारुधंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी आपण अधिवेशनात केली होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कामशेत परिसरात मिळालेल्या गावठी दारूचे कॅन नेऊन अवैध दारू धंद्याच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचा इशाराही शेळके यांनी दिला. दरम्यान संबंधित पोलिस निरीक्षकावर दोन दिवसांत कारवाईचे आश्वासन पोलीस अधीक्षक देशमुख यांनी दिल्यानंतर आमदार शेळके यांनी आंदोलन स्थगित करीत असल्याची घोषणा केली. अवैध दारुधंद्यांच्या विरोधात आपली लढाई चालूच राहील, त्यासाठी यापेक्षा तीव्र जनआंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Back to top button