सिंहगडावर पर्यटकांचा ‘सुपर संडे’; दिवसभरात सव्वा लाखाचा टोल | पुढारी

सिंहगडावर पर्यटकांचा ‘सुपर संडे’; दिवसभरात सव्वा लाखाचा टोल

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: दर रविवारी तसेच सुटीच्या दिवशी सिंहगड घाटरस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे शेकडो पर्यटक तासन् तास अडकून पडतात. रविवारी (दि. 21) वन विभाग व हवेली पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले. गडावर पर्यटकांची गर्दी होऊनही दिवसभर वाहतूक सुरळीत राहिल्याने पर्यटकांसाठी रविवार हा सुपर संडे ठरला. दिवसभरात गडावर वाहनांनी जाणार्‍या पर्यटकांकडून तब्बल सव्वा लाख रुपयांचा टोल वन खात्याने वसूल केला.

रिमझिम पाऊस, दाट धुके अशा वातावरणात सिंहगडावर पावसाळी पर्यटनासाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांसह मुंबई-पुण्यासह देशभरातील पर्यटकांची सकाळपासून वर्दळ सुरू होती. सकाळी दहा वाजताच गडावरील वाहनतळ फुल्ल झाले होते. त्यामुळे गडावर जाणार्‍या पर्यटकांना डोणजे गोळेवाडी व अवसरवाडी टोल नाक्यावर थांबविण्यात आले. गडावरील वाहने खाली येऊ लागल्यानंतर टप्प्याटप्प्याने पर्यटकांना गडावर सोडण्यात आले. अवसरवाडी फाटा, घाटरस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली.

तेराशे दुचाकी, 515 चारचाकी वाहने गडावर
सिंहगड वन विभागाचे वनरक्षक बाबासाहेब जिवडे म्हणाले की, गडावरील पर्यटक खाली आल्याने वाहनतळावर जागा रिकामी केली जात होती. त्यानुसार गडावर पर्यटकांना सोडण्यात आले. गडावर तीन तासांपेक्षा जादा काळ थांबू नये, असे आवाहन केले जात आहे. त्यास पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे जादा पर्यटकांना गडावर जाता आले. दिवसभरात गडावर पर्यटकांची 1300 दुचाकी व 515 चारचाकी वाहने गेली. आतकरवाडी व इतर पायी मार्गाने गडावर मोठ्या संख्येने पर्यटक आले होते.

हुल्लडबाजांना चाप
हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या देखरेखीखाली हवालदार प्रवीण ताकवणे, शांताराम मोरे आदींसह पोलिस जवान गडाच्या पायथ्यापासून घाटरस्ता, गडाच्या वाहनतळावर तैनात होते. घाटरस्त्यावर तसेच अवसरवाडी फाटा आदी ठिकाणी वाहने उभी करून हुल्लडबाजी करणार्‍या पर्यटकांना पोलिसांनी प्रतिबंध केला.

खडकवासला धरण चौपाटीवर वाहनकोंडी
खडकवासला धरण चौपाटीवरील पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक दुपारनंतर कोलमडली. प्रचंड वाहतूक कोंडीने पर्यटकांसह स्थानिक नागरिक त्रस्त झाले.

Back to top button