पुणे; पुढारी वृतसेवा: राज्यात संपलेल्या ऊस गाळप हंगामात उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीचे (एफआरपी) सुमारे 31 हजार 973 कोटी 5 लाख रुपये शेतकर्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात आलेले आहेत. हंगाम 2021-22 मध्ये 200 साखर कारखान्यांनी 1 हजार 322 लाख मे. टन इतके ऊस गाळप पूर्ण केलेले आहे. त्यामध्ये ऊस तोडणी वाहतूक खर्च वगळून शेतकर्यांना एफआरपीची देय रक्कम 33 हजार 264 कोटी 66 लाख रुपये इतकी आहे.
त्यापैकी प्रत्यक्षात शेतकर्यांना 31 हजार 973 कोटी पाच लाख रुपये देण्यात आलेले आहेत. तर 1 हजार 291 कोटी 61 लाख रुपये अद्याप देणे बाकी आहेत. देय रकमेच्या जवळपास 96.12 टक्क्यांइतकी रक्कम शेतकर्यांना देण्यात आलेली आहे. शंभर टक्के एफआरपीची रक्कम 89 कारखान्यांनी दिलेली आहे. तसेच 80 ते 99 टक्क्यांइतकी रक्कम सुमारे 100 साखर कारखान्यांनी दिलेली आहे. 60 ते 79 टक्क्यांइतकी रक्कम 8 आणि शून्य ते 59 टक्क्यांइतकी रक्कम 3 कारखान्यांनी दिलेली असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी दिली.
ते म्हणाले, 'साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत थकीत एफआरपीची रक्कम देण्यासाठी साखर कारखान्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. येणारा ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी संपूर्ण एफआरपीची रक्कम देणे अपेक्षित आहे. तरच त्यांना ऊस गाळप परवाना देण्यात येणार आहे. तसेच आत्तापर्यंत थकीत एफआरपीप्रकरणी एकूण सात साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत.'