पुणे : तीन दुकाने फोडून आठ लाखांची चोरी | पुढारी

पुणे : तीन दुकाने फोडून आठ लाखांची चोरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चोरट्यांनी बाणेर व कोंढव्यात तीन दुकाने फोडून 8 लाखांचा ऐवज चोरून नेला, तर मांजरी भागात बंद फ्लॅट फोडण्यात आला. बाणेर रस्ता येथील घटनेत रणजित वाघ (वय 44) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे बाणेर रस्त्यावरील वर्षा पार्क येथे ऑफिस आहे. त्यांची आर्किटेक्टची फर्म आहे.

चोरट्यांनी हे ऑफिस बंद असताना मध्यरात्री इमारतीच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. तसेच, डॉलर, हिर्‍याचे दागिने, चांदीची कटलरी व मोत्याचे दागिने असा 6 लाख 43 हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. तपास चतु:शृंगी पोलिस करत आहेत. दुसर्‍या घटनेत कोंढव्यात दोन बंद दुकाने चोरट्यांनी फोडली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात सचिन मारूती जाधव (वय 45) यांनी तक्रार दिली आहे. सचिन यांचे रायबा फॉर मेन्स नावाचे कपड्यांचे दुकान आहे. चोरट्यांनी बंद दुकान फोडले व सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला.

मांजरी परिसरात चोरी
मांजरी परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडत 45 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात नंदकिशोर दुबे यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

नोकरीच्या बहाण्याने गंडा
मोबाईलधारकाने फोन करून नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने व एकाने पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल 12 लाख 20 हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात मोबाईलधारक व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रसन्न सांगलीकर (52, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

Back to top button