पिंपरी : पोलिस असल्याचे भासवून व्यावसायिकाचे अपहरण पाच लाखांची मागणी | पुढारी

पिंपरी : पोलिस असल्याचे भासवून व्यावसायिकाचे अपहरण पाच लाखांची मागणी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पोलिस असल्याची बतावणी करीत तिघांनी मिळून एका व्यावसायिकाचे अपहरण केले. तसेच, त्याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करून मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 18) रात्री साडेआठच्या सुमारास भोसरी येथे घडला . नितीन शंकर धिमधिमे (41, रा. आकुर्डी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना ‘मी भोसरी पोलिस ठाण्याचा सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव आहे. मला तुझे घर बघायचे आहे. तू माझ्या गाडीत बस’, असे सांगून एका गाडीत बसवण्यास भाग पाडले.

त्यावेळी गाडीमध्ये आणखी दोन इसम होते. त्यांनी देखील आपण पोलिस असल्याचे सांगितले. दरम्यान, गाडी पुढे गेल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करीत पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांना औंध येथील परिहार चौकात सोडून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button