पुणे; पुढारी वृत्तसेवा: सरकारी नोकरदार, बागायती शेती, खासगी क्षेत्रातील मोठे पगारदार, याशिवाय आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्यांनी रेशनवरील स्वस्त धान्याचा हक्क सोडावा, असे आवाहन 2016 मध्ये राज्य शासनाने केले होते. मात्र, शहर आणि जिल्ह्यातील एकाही लाभार्थ्याने स्वस्त धान्य सोडले नाही. त्यामुळे श्रीमंतांना स्वस्त धान्याचा मोह सुटत नसल्याने जिल्हा प्रशासनाने आता शोध मोहीम सुरू केली आहे.
शहरात तसेच जिल्ह्यात रेशनकार्डला आधार जोडणीचे काम सुरू असून, दुबार तसेच आधार न जोडलेल्या सुमारे 90 हजारहून अधिक लाभार्थी कमी करण्यात आले आहेत. या मोहिमेत उच्च उत्पन्न गटातील जे नागरिक धान्य घेत आहेत, अशांचाही शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्राप्तिकर भरणारे तसेच उच्च उत्पन्न गटातील शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्यावरील हक्क सोडावा; अन्यथा तपासणीत आढळून असल्यास ते रद्द केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसवरील अनुदान सोडावे, असे आवाहन केले होते. त्या वेळी अनेकांनी स्वतःहून अनुदान सोडले. परंतु, 2016 पासून रेशनवरील स्वस्त धान्य घेणे सोडा, या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. अनेक धनदांडगे लोक गरज नसताना तसेच त्यांची खुल्या बाजारातून धान्य खरेदी करण्याची ऐपत असतानाही रेशनचे धान्य घेत आहेत. धान्यावरील हक्क सोडण्यासाठी ही मंडळी स्वतःहून पुढे आली नाहीत, तर पुरवठा निरीक्षकांमार्फत चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.
योजनेसाठी कोण होते पात्र?
शहरी भागात 59 हजार रुपये, तर ग्रामीण भागात 44 हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणार्या कुटुंबांना प्राधान्य गटात या योजनेचा लाभ दिला जातो. मात्र, धान्य घेणार्यांपैकी किमान 50 टक्के लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न लाख रुपयांपेक्षा अधिक असू शकते, असा अंदाज प्रशासनाला आहे.
नागरिकांनीही अशा लोकांची पुरवठा विभागाकडे माहिती द्यावी, त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील. त्यासाठी 'गिव्ह इट अप'चे अर्ज सर्व स्वस्त धान्य दुकानदारांकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशा नागरिकांची नावे धान्य कोट्यातून कमी केल्यावर यातून गरीब व गरजू नागरिकांना प्राधान्याने धान्य उपलब्ध करून देण्यात येईल.
– सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे
ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारक
अंत्योदय शिधापत्रिका : 49,244
लाभार्थी : 2 लाख 17 हजार 651
मिळणारे धान्य प्रतिशिधापत्रिका
गहू 15 किलो दोन रुपये प्रतिकिलो
तांदूळ 20 किलो तीन रुपये प्रतिकिलो.
प्राधान्य योजना
शिधापत्रिका : 5 लाख 33 हजार 417
लाभार्थी : 24 लाख 82 हजार 478
मिळणारे धान्य (प्रत्येक व्यक्ती)
गहू : दोन किलो
तांदूळ : तीन किलो
पुणे आणि पिंपरी-चिंचवड लाभार्थी
अंत्योदय शिधापत्रिका : 8,013
लाभार्थी : 34 हजार 753
मिळणारे धान्य प्रतिशिधापत्रिका
गहू 15 किलो दोन रुपये प्रतिकिलो.
तांदूळ 20 किलो तीन रुपये प्रतिकिलो
प्राधान्य योजना
शिधापत्रिका : 3 लाख 19 हजार 758
लाभार्थी : 13 लाख 1 हजार 114
मिळणारे धान्य
प्रत्येक व्यक्ती – गहू – दोन किलो
तांदूळ – तीन किलो