पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'कर्करोगानंतर शस्त्रक्रियेचा त्रास दूर करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला ढोल-ताशा वादनाचा मंत्र स्वीकारला आणि आमच्यात आमूलाग्र बदल घडला. दैनंदिन आयुष्यात आत्मविश्वास आणि उत्साहदेखील निर्माण झाला.' अशा शब्दांत स्तनाच्या कर्करोग शस्त्रक्रियेनंतर वेदना सहन करणार्या महिलांनी आपले अनुभव रविवारी (दि.21) मांडले.
यावेळी चक्क ढोल-ताशा वादन करीत त्यांनी आपल्यातील कलेला मोकळी वाट करून दिली अन् त्यांच्या वादनाने उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते आस्था ब्रेस्ट सपोर्ट ग्रुप पुणे व ढोल-ताशा महासंघातर्फे आयोजित एका सोहळ्याचे. यावेळी स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांनी ढोल-ताशा वादन प्रत्यक्षपणे अनुभवीत वादनाचे फायदेदेखील जाणून घेतले. या उपक्रमाकरिता ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला होता.
ठाकूर म्हणाले, 'स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांच्या हालचालींवर मर्यादा येतात. मात्र, ढोल-ताशा वादनाने हा त्रास कमी होत असल्याचे दिसून आल्यानंतर महासंघाकडे डॉ. कुलकर्णी यांनी अशा महिलांना आपण प्रशिक्षण द्यावे, अशी विनंती केली. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ आणि मंडळाचे कार्याध्यक्ष ओंकार कलडोणकर यांच्यावर ही जबाबदारी महासंघातर्फे सोपविण्यात आली आणि त्यांनी ती उत्तमरीतीने पार पाडली आहे.'
डॉ. कुलकर्णी म्हणाले, 'वय वर्षे 40 ते 70 मधील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले व त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला आहे. हाताच्या वेदना कमी होणे, ताजेतवाने वाटणे, रक्तदाब नियंत्रणात येणे, कोणतेही काम करण्यास उत्साह, नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत, असे अनेक चांगले परिणाम वादनाने त्या रुग्णांमध्ये झाले आहेत.'