वालचंदनगर : अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार | पुढारी

वालचंदनगर : अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा: बेलवाडी (ता.इंदापूर) येथे एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील पीडितेला बळजबरीने मक्याच्या शेतात ओढून नेत नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असून, शनिवारी (२० ऑगस्ट) घडलेल्या या घटनेसंदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वालचंदनगर (ता. इंदापूर) पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भा. द. वि. ३७६ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी राहुल हनुमंत जाधव (रा. बेलवाडी, ता. इंदापूर) या मुख्य आरोपीस वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर दोघे अद्याप फरार आहेत.

शनिवारी (२० ऑगस्ट) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत राहुल हनुमंत जाधव याने पीडितेला शेतात जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने ओमिनी या चारचाकीमधून आलेल्या त्याच्या दोघा साथीदारांपैकी (नाव व पत्ता माहीत नाही) एकाने पीडितेवर जबरदस्ती केली. या दोघांनीही चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. तदनंतर आरोपींनी पिडीतेस ओमिनी गाडीतून इंदापूर बारामती रोडवर असलेल्या एका घरात घेऊन गेले.

थोड्यावेळाने त्याच गाडीतून आरोपींनी तिला बेलवाडी बस स्थानकावर सोडले. विशेष म्हणजे या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या राहुल जाधव याने सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडीतून पीडितेच्या घरासमोर येऊन पीडितेच्या आईला जातीवाचक शिवीगाळ व हाताने मारहाण केली. या तिघा नराधमांपैकी मुख्य आरोपी असलेल्या राहुल हनुमंत जाधव याला वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.

Back to top button