पुणे : विश्वविक्रमासाठी ‘एआय’चा वापर | पुढारी

पुणे : विश्वविक्रमासाठी ‘एआय’चा वापर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘हर घर तिरंगा’अंतर्गत राष्ट्रध्वजासोबतचे दीड लाखापेक्षा अधिक फोटो अपलोड करण्याच्या विश्वविक्रमाची नोंद 15 ऑगस्टला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर काही तासांतच पावणेदोन लाख फोटोंमधून जवळपास 23 हजार अयोग्य फोटो वगळण्यात आले. हे काम शक्य झाले ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) प्रणालीमुळे. विद्यापीठाला लाखो फोटो काही तासांत प्रक्रिया करून त्यातील योग्य ते गिनीज बुकला द्यायचे होते. विद्यापीठाने ही अवघड जबाबदारी तंत्रज्ञान विभाग अधिष्ठाता डॉ. आदित्य अभ्यंकर व टीमकडे सोपवली होती. 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर फोटोंचा साईज व सर्व एकाच फॉरमॅटमध्ये आणणे असे प्री-प्रोसेसिंग पहाटे 3 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले.

त्यानंतर राष्ट्रध्वजाचा अवमान होईल असे संवेदनशील फोटो, एकाच व्यक्तीने अपलोड केलेले अनेक फोटो व राष्ट्रध्वजाला हात न लावलेले, ध्वज मागे व नागरिक पुढे असलेले असे फोटो अवघ्या काही तासांत काढायचे होते. हे तीन प्रकारचे फोटो काढून टाकण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, याकरिता तंत्रज्ञान विभागानेच विकसित केलेली पेटेंटेड कृत्रिम बुध्दिमत्ता संगणक प्रणाली (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) धावून आली. अवघ्या काही तासांतच या प्रणालीने तीनही प्रकारचे फोटो त्यामध्ये दिलेल्या आज्ञावलीनुसार बाजूला केले. त्यानंतर चेहर्‍यांवरून माणसे ओळखून (फेस रेकग्निशन) 1 लाख 52 हजार 559 फोटोंची अंतिम संख्या देखील निश्चित केली.

‘एआय’ने नेमके काय केले?
‘एआय’ने चित्रात व्यक्ती व ध्वज आहे, व्यक्तीने ध्वज हाताने पकडलेला असणे, ध्वज पूर्ण दिसतोय का, चेहरा पूर्ण दिसतोय का, हे निश्चित केले.
प्रत्येक चेहर्‍याचे 28 प्रकारे विश्लेषण करण्यात आले. आलेल्या फोटोतील प्रत्येक फोेटो एकमेकांसोबत पडताळला. त्यामुळे डुप्लिकेट फोटो वगळण्यास मदत झाली.
अत्यंत ताकदीचे नोडल सर्व्हर संगणक या कामाकरिता वापरले गेले.

या प्रक्रियेत एक चूक झाली असती, तर सर्व निष्फळ ठरले असते. पण, तंत्रज्ञान पथकाने 38 तास अविश्रांत मेहनत घेऊन एकही चूक न होऊ देता आणि विशिष्ट वेळेपूर्वी सर्व प्रक्रिया यशस्वी करून दाखवली. देशाच्या कामी माझ्या पीएच. डी. विद्यार्थ्यांनी दिलेले योगदान विशेष असून, त्याचा अभिमान आहे.

– प्रो. डॉ. आदित्य अभ्यंकर, संचालक, तंत्रज्ञान प्रशाला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Back to top button