पुणे : मोदींची सत्ता घालविण्याचे आमचे प्रयत्न सुरू राहतील: डॉ. कुमार सप्तर्षी यांची माहिती | पुढारी

पुणे : मोदींची सत्ता घालविण्याचे आमचे प्रयत्न सुरू राहतील: डॉ. कुमार सप्तर्षी यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘आयुष्य हे सत्याचे दर्शन होण्याचे माध्यम असून, आशयपूर्ण जगण्यासाठी आणखी जगावे, असे वाटते. पण, मोदींची सत्ता गेल्याशिवाय ते शक्य नाही. म्हणून, मोदींची सत्ता घालविण्याचे आमचे प्रयत्न सुरू राहतील,’ अशी माहिती डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांनी 21 ऑगस्ट 2022 रोजी 82 व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी डॉ. सप्तर्षी बोलत होते. या वेळी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांची खुमासदार शैलीत प्रकट मुलाखत घेतली. त्यातून डॉ. सप्तर्षी यांच्या जीवनाचे पैलू उलगडत गेले.

या वेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार, उद्योजक कल्याण तावरे, गांधी भवनचे सचिव अन्वर राजन, डॉ. ऊर्मिला सप्तर्षी आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘खासगीकरणानंतरच्या काळात भांडवलदारांचे पॉलिटिकल एजंट राज्य करू लागले आहेत. ते जनतेला धाकात ठेवू लागले आहेत. राजकीय व्यवस्था सर्वोच्च राहिलेली नसून, भांडवलदार सर्वोच्च झाले आहेत. फॅसिस्ट रचना आणली जात असून, हिंसा आवडावी, असा प्रयत्न चालू आहे. त्याविरोधात मोठा लढा द्यावा लागणार आहे,’ असेही
डॉ. सप्तर्षी म्हणाले.

डॉ. कुमार सप्तर्षी हे प्रेम, बंधुता आणि एकात्मतेसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणारे आजच्या काळातील ते महात्मा गांधी आहेत. तरुणांना मार्गदर्शन करणारे विद्यापीठ असून, पुढच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल’, असे मत आबेदा इनामदार यांनी व्यक्त केले.

Back to top button