पिंपरी : भारताची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट, पालिका व्याख्यानमालेत अच्युत गोडबोले यांचे मत | पुढारी

पिंपरी : भारताची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट, पालिका व्याख्यानमालेत अच्युत गोडबोले यांचे मत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भारताची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यासाठी केवळ सध्याचे सरकार जबाबदार नसून, जागतिकीकरणाचा योग्य पद्धतीने स्वीकार न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्थिक विषमता तसेच, बेरोजगारी वाढली आहे, असे मत लेखक अच्युत गोडबोले यांनी रविवारी  व्यक्त केले. महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित साहित्य अमृत ग्रंथोत्सव व व्याख्यानमालेत तो बोलत होते. या वेळी उपायुक्त रविकिरण घोडके, महारष्ट्र साहित्य परिषदचे शाखाध्यक्ष राजन लाखे, उमेश पाटील, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

गोडबोले म्हणाले की, जागतिकीकरणाचे अनेक फायदे झाले. निम्न मध्यमवर्ग मध्यमवर्गात गेला. मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्गात गेला. मात्र, ही प्रगती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचली नसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता निर्माण झाली, बेरोजगारी व अर्ध बेरोजगारी निर्माण झाली. प्रगती ठराविक शहरांपर्यंत मर्यादित राहिली, जीडीपी वाढीच्या तुलनेत अपेक्षित रोजगार निर्मिती झाली नाही. त्यामुळे भारताची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. जागतिकीकरणाचे तोटे आणि फायदे दोन्ही झाले.

या परिस्थितीतून भारताला बाहेर येण्यासाठी शिक्षण, आरोग्य, संशोधन, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागेल. त्या सुविधा तळागळातील लोकांपर्यंत पोहचवल्यास भारत नक्कीच चांगल्या स्थितीत येईल. आर्थिक विषमता ही लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. विषमता असेल आर्थिक संकट येऊ शकते.शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अपेक्षित खर्च करून सामाजिक पायाभूत सुविधा निर्माण केल्यास विषमता कमी होण्यास मदत होईल. सामाजिक पायाभूत सुविधा निर्मितीमुळे भारत प्रचंड प्रगती करेल, असे ते म्हणाले.

Back to top button