पुणे : मराठी तरुणांचा युरोपियन देशात डंका; विदेशी विद्यापीठात वाढतेय विद्यार्थ्यांची संख्या | पुढारी

पुणे : मराठी तरुणांचा युरोपियन देशात डंका; विदेशी विद्यापीठात वाढतेय विद्यार्थ्यांची संख्या

दिगंबर दराडे

पुणे : भारतीय मुलांचा विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा ओढा झपाट्याने वाढत असून युरोपियन विद्यापीठात सत्तर टक्के भारतीय विद्यार्थी दिसतात. अनेक विद्यार्थी एक वर्षाच्या पदवीपासून ते पीएचडीपर्यंत परदेशात शिक्षण घेत आहेत. विदेशातील विद्यापीठांमध्ये मराठी विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक देशांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने मराठी तरुणांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच नोकरीच्यादेखील संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळेे आता मध्यमवर्गीय तरुणदेखील परदेशी शिक्षणांची कास धरत आहे.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आता मराठी तरुणांचा टक्का वाढत आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर येथून विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मागील दोन वर्षांत हे प्रमाण वाढत आहे.
                                             आदित्य पवार, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

पुण्यातून येऊन या ठिकाणी शिक्षण घेत आहे. सुरुवातीला याठिकाणी येत असताना मनात भीती होती. मात्र, या ठिकाणी आल्यानंतर मराठी मुलामुलींची संख्या पाहिल्यानंतर आनंद झाला.
                                                              कीर्ती रांका, इस्तितुतो मारंगोनी

मराठी मुले आता विदेशात जाण्याला अधिक पसंती देत आहेत. दिवसेंदिवस हा टक्का वाढत आहे. पूर्वी ठराविक मुले या देशात येत होती. आता हे प्रमाण वाढत चालले आहे.
                                                      श्रेयश महाजन, ब्रुनेल युनिव्हर्सिटी

आमच्या विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी लंडनला शिक्षण घेण्याकरिता पसंती दिली आहे. या ठिकाणी शिक्षणामध्ये संशोधनावर आणि वास्तवावर अधिक भर देण्यात आलेला आहे. मराठी तरुणांचा याचा निश्चितपणे फायदा होईल.
                                                 श्रीराज भरणे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

आपल्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत. यामुळे उच्च शिक्षणासाठी मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांच्या बरोबर आता मुलीदेखील परदेशी शिक्षणाला पसंती देत आहेत.
                                                             कृषाली पटेल, ब्रुनेल युनिव्हर्सिटी

पुणे, मुंबई या शहरातून मराठी तरुण अधिक प्रमाणात युरोपला शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. येथील प्रत्येक विद्यापीठात मराठी तरुण-तरुणी शिक्षण घेताना दिसत आहेत.
                                वरुण पितळिया, ऑक्सफर्ड ब्रुनेल युनिव्हर्सिटी

परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतल्याने चांगल्या नोकरीच्या संधी वाढत आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी आता मराठी तरुण पुढे सरसावत आहे.
                                                       अभिषेक खांडेकर, ब्रुनेल युनिव्हर्सिटी

परदेशी शिक्षण महाग असले तरी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये याचा निश्चितपणे फायदा होताना दिसत आहे. जगातून या ठिकाणी मुले शिक्षणासाठी येत आहेत. यामध्ये आता मराठी तरुणदेखील मागे राहिलेला नाही.
                                                           मनीष राठी, क्वीन मेरी युनिव्हर्सिटी

भारतात तयार होतात 16 लाख अभियंते
आपल्या देशात दरवर्षी 16 लाख अभियंते तयार होत आहेत.प्रत्येकाला नोकरी मिळतेच असे नाही. नोकरीच्या संधी आणि शिक्षणाचा दर्जा आता विद्यार्थी पाहत आहेत. यामुळे परदेशी शिक्षणाला अधिक पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. लंडन, पॅरिस, जर्मनी, बोन्सिया, न्यूझीलंड, रशिया, अमेरिका या देशात शिक्षण घेण्यासाठी जाण्याचा मराठी तरुणांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे.

Back to top button