386 जागांसाठी 2 लाख अर्ज प्राप्त होण्याची शक्यता | पुढारी

386 जागांसाठी 2 लाख अर्ज प्राप्त होण्याची शक्यता

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील 16 पदांच्या 386 जागांसाठी सरळ सेवेने ‘मेगा भरती’ करण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यास शुक्रवार (दि.19) पासून सुरुवात झाली आहे. किमान दोन लाख अर्ज प्राप्त होतील, असा पालिका प्रशासनाचा अंदाज आहे.
निवृत्ती व स्वेच्छानिवृत्ती तसेच, पदोन्नतीमुळे पालिकेत सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी पालिका वेळोवेळी कंत्राटी पद्धतीने कर्मचार्‍यांची नेमणूक करीत आहे.

राज्य सरकारने नुकतीच नोकर भरती बंदी उठविली आहे. त्यामुळे पालिकेने यापूर्वी वैद्यकीय विभागातील स्टाफ नर्स, एएनएमसह इतर तांत्रिक अशा 131 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली. मात्र, स्टाफ नर्स भरती प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता, पालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील 386 रिक्त जागांची सरळ सेवेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

त्यामध्ये अतिरिक्त कायदा सल्लागार 1, विधी अधिकारी 1, उपमुख्य अग्निशमन अधिकारी 1, विभागीय अग्निशमन अधिकारी 1, उद्यान अधीक्षक वृक्ष 1, सहायक उद्यान अधीक्षक 2, उद्यान निरीक्षक 4, हॉर्टिकल्चर सुपरवायझर 8, कोर्ट लिपिक 2, अ‍ॅनिमल किपर 2, समाजसेवक 3, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 41, लिपिक 213, आरोग्य निरीक्षक 13, स्थापत्य कनिष्ठ अभियंता 75 आणि विद्युत कनिष्ठ अभियंता 18 अशा विविध पदांवर सरळ सेवेने भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने शुक्रवार (दि.19) पासून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज 8 सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारांची ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विविध शहरातील केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.

विक्रमी संख्येने अर्ज येण्याची शक्यता
भरती प्रक्रियेत जागांची संख्या आरक्षणानुसार आहे. त्याबाबत आवश्यक शैक्षणिक अर्हता व माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहे. मागील अनुभव पाहता या पदासाठी सुमारे 2 लाख अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासन तयारी करीत आहे, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

Back to top button