पिंपरी : शहराच्या विविध भागांत विजेचा लपंडाव | पुढारी

पिंपरी : शहराच्या विविध भागांत विजेचा लपंडाव

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहराच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण सेक्टर नंबर 26, मोहननगर, चिंचवड, खराळवाडी पिंपरी आदी भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. भरमसाठ वीज बिले वीज वितरण कडून पाठवली जातात. वीज बिले वेळेवर न भरल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता वीजजोड कट केले जाते. मग वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल केला जात आहे.

शहरात विविध भागात वीज पुरवठा खंडित होत असण्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत तांत्रिक बिघाड किंवा महावितरणची केबल तुटल्याने वीज पुरवठा खंडित होतो. शहरात भूमिगत वीज वाहिन्यांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन-चार महिन्यात विविध कारणांसाठी झालेल्या खोदकामात उच्च व लघुदाब भूमिगत वीज वाहिन्यांना इजा पोहोचल्याने वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तसेच काही ठिकाणी विद्युत तारांवर झाडे अथवा फांद्या कोसळल्यानेही वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

प्राधिकरण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. शनिवारी सकाळी 11 वाजता सेक्टर नंबर 26 मध्ये वीज पुरवठा खंडित झाला. संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. महावितरणचे तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा बंद राहणार असेल तर पूर्वी एसएमएस यायचे तेही बंद झाले आहे.
                                                       – वृषाली ठाकरे, निसर्ग सोसायटी प्राधिकरण

 

मोहननगर भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो एकदाच योग्य ती दुरुस्ती का करत नाहीत असा नागरिकांचा सवाल आहे.
                                                          – मारुती भापकर, मोहननगर

Back to top button