सोमेश्वरनगर : शिंदे-फडणवीस स्वतःच्या फायद्यासाठी सत्तेत : धनंजय मुंडे | पुढारी

सोमेश्वरनगर : शिंदे-फडणवीस स्वतःच्या फायद्यासाठी सत्तेत : धनंजय मुंडे

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: गेल्या साडेसात वर्षांपासून मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे. यंत्रणेचा वापर देशाच्या सुरक्षिततेसाठी करण्याची गरज आहे. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही. नव्याने स्थापन झालेले सरकार ईडी म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असे तयार झाले असून, ते स्वतःच्या फायद्यासाठी आले असल्याची टीका माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. करंजेपूल (ता. बारामती) येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितीन यादव यांच्या घरी मुंडे यांनी शनिवारी (दि. 20) भेट दिली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी सभापती नीता फरांदे, सरपंच वैभव गायकवाड, रमाकांत गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, लक्ष्मण गोफणे आदी या वेळी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले की, राज्य सरकार कोण चालवतेय ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील ऊसतोड मजुरांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्या यापुढेही सुरू ठेवाव्यात. सामाजिक न्याय विभागाकडून ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जात आहे. ऊसतोड मजुरांना ओळखपत्र व क्रमांक देण्याचे काम सुरू आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ऊसतोड मजुरांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मजुरांसाठी सरकार राज्यातील कारखान्यांकडून प्रति टन 10 रुपये व सरकार 10 रुपये देणार असल्याबाबत शासन निर्णय झाला आहे. यातून मागील वर्षासाठी जवळपास 175 कोटी रुपये महामंडळासाठी मिळतील अशी माहितीही मुंडे यांनी दिली.

 

Back to top button