ढोरजळगाव : रस्त्यावरील खड्डा मृत्यूचा सापळा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने ग्रामस्थ संतप्त | पुढारी

ढोरजळगाव : रस्त्यावरील खड्डा मृत्यूचा सापळा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने ग्रामस्थ संतप्त

ढोरजळगाव : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव-मिरी मार्गावर ढोरजळगाव येथे रस्ता उखडून मोठा खड्डा पडल्याने आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले आहेत. एका महिलेच्या मेंदूस मार लागल्याने तिच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. शेवगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्ष्यम्य दुर्लक्षामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तातडीने हा खड्डा बुजविण्याची मागणी प्रवासी व वाहन चालकांनी केली आहे. ढोरजळगाव येथील पाटेकर वस्तीजवळ रस्ता पावसामुळे उखडून मोठा खड्डा पडला आहे. सुरवातीला छोट्या असणार्‍या या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचून आणि सततच्या अवजड वाहतुकीमुळे रस्ता मधोमध खचला आहे.

पावसाचे पाणी साचल्याने आणि रस्त्यावर अंधार असल्याने जवळ येईपर्यंत वाहन चालकाला त्याचा अंदाज येत नाही. परिणामी या खड्ड्यात पडून 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत. दुचाकीवरून पडून एका महिलेच्या मेंदूला मार लागल्याने रुग्णालयात भरती व्हावे लागले आहे. या खड्ड्याच्या मागे-पुढेही छोटे-मोठे अनेक खड्डे पडले आहेत. अचानक दिसणार्‍या खड्ड्यांमुळे वाहनचालक एका बाजूने वाहन घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

ढोरजळगाव परिसरातील निंबेनांदूर, आव्हाने या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाची कामे करूनही ठेकेदारांना पाठीशी घालणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचे रस्त्यावरील खड्ड्यांकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांसह प्रवासी व वाहनचालकांनी दिला आहे.

Back to top button