अकरावी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ; केवळ 40 हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश | पुढारी

अकरावी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ; केवळ 40 हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थी मोठ्या संख्येने पाठ फिरवत असल्याचे चित्र दिसून आले आहे. अकरावीच्या दोन नियमित फेर्‍यांनंतरही केवळ निम्मेच प्रवेश झाले असून, जवळपास 80 हजार विद्यार्थ्यांपैकी 40 हजार विद्यार्थ्यांनीच आपले प्रवेश निश्चित केले आहेत. तिसर्‍या फेरीत आणखी सात ते आठ हजार प्रवेश होण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 1 लाख 9 हजार 310 जागा उपलब्ध आहेत.

प्रवेशासाठी एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, यातील जवळपास 80 हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला. प्रवेशाच्या दोन फेर्‍यांनंतर 40 हजार प्रवेश झाल्याचे दिसून आले आहे. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना तिसर्‍या फेरीत प्रवेश घ्यावे लागणार आहेत; परंतु हे सर्व प्रवेश या फेरीत होतील, अशी कोणतीही शक्यता नाही. यामुळे यंदा प्रवेशाचे प्रमाण आणखी घटणार असल्याचे चित्र आहे. 22 ते 24 ऑगस्टदरम्यान तिसरी फेरी होणार असून, काही विद्यार्थी आपल्याला हवे ते कॉलेज मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

पहिल्या आणि दुसर्‍या फेरीतील काही महाविद्यालयांचे ‘कट ऑफ’ केवळ दोन ते तीन गुणांनी कमी झाले होते. परिणामी तिसर्‍या फेरीतही ‘कट ऑफ’ फार घसरणार नसल्याचे दिसत असून, तिसर्‍या फेरीत विद्यार्थ्यांना मिळेल त्या महाविद्यालयावर समाधान मानावे लागेल. तिसर्‍या फेरीनंतरही काही विशेष फेर्‍या आयोजित केल्या जातील. मात्र, त्याचा प्रवेशावर फारसा परिणाम दिसून येणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Back to top button