बारामती : निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध | पुढारी

बारामती : निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध

बारामती/भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा; बारामती शहरात निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण झाल्यानंतर विहिरी, कूपनलिकांचे पाणी कमी पडले असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागात कालवा अस्तरीकरणाला ग्रामस्थांनी मोठा विरोध सुरू केला आहे. गावोगावी ग्रामसभा घेत अस्तरीकरणाविरोधात ठराव घेतले जात आहेत. सोमेश्वरनगर भागात कालवा दुरुस्ती व अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे कालव्याचा पाझर बंद होऊन शेतीला पाणी कमी पडेल, अशी भीती शेतकर्‍यांमध्ये आहे.

अनेक शेतकर्‍यांनी कालव्यालगत जमिनी घेऊन तेथे विहिरी खोदल्या आहेत. ज्या ठिकाणी कालवा फुटण्याचा धोका आहे, तेथे अस्तरीकरण केले जात असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगितले जात असले तरी, शेतकर्‍यांच्या मनामध्ये पाणी कमी पडण्याची भीती कायम आहे. कालव्याचे अस्तरीकरण न करता त्याची दुरुस्ती करावी, ज्या ठिकाणी कालवा फुटण्याचा संभव वाटतो, तेथे कालव्याची खोली अधिक करत अन्य उपाययोजना कराव्यात अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

निरा डावा कालवा 152 किमी अंतराचा आहे. या कालव्याला मध्यंतरी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर, पणदरे, पिंपळी आदी परिसरात गळती लागली होती. त्या कारणावरून कालवा फुटण्याची भीती जलसंपदा विभागाला आहे. त्यासाठी अस्तरीकरण केले जात आहे. 152 किमी अंतरापैकी 30 किमी भागाचे अस्तरीकरण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे माळेगाव व पणदरे ग्रामपंचायतीने यापूर्वीच अस्तरीकरण नको, अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता पणदरे परिसरासह सोमेश्वरनगर, कोर्‍हाळे, काटेवाडी, कन्हेरी आदी भागांतूनही विरोध वाढतो आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (दि.19) कन्हेरीत झालेल्या बैठकीला भवानीनगर, काटेवाडी, कन्हेरी, पिंपळी लिमटेक, गुणवडी, सावळ, जळोची, लाकडी, निंबोडी, सणसर आदी भागातील शेतकरी उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत अस्तरीकरण करून दिले जाणार नाही, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

 

Back to top button